नगर मनपाचा जेसीबी धूळखात पडून | पुढारी

नगर मनपाचा जेसीबी धूळखात पडून

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अहमदनगर महानगरपालिकेच्या कारभारावर रोज टीका-टिपणी होते. तरी त्यामध्ये सुधारणा होण्याऐवजी अजून ढिसाळ कारभार पाहयला मिळतो. मनपाने शहरातील विविध कामांसाठी नवीन जेसीबी खरेदी केला. पण चालकाअभावी जागेवर उभा आहे. त्यामुळे मनपाची अनेक कामे खोळंबली आहेत. दोन दिवसांत चालक उपलब्ध न केल्यास महापालिकेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक निखील वारे यांनी दिला. प्रसिद्धीपत्रकात म्हटले, वाहन चालक उपलब्ध होत नसल्याने मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने टेंडर काढून कुशल वाहनचालक खासगी संस्थेमार्फत नियुक्त केले.

तरीही ठेकेदाराकडून 1 नोव्हेंबरपासून जेसीबीच्या वाहनांवर ड्रायव्हर उपलब्ध नाहीत. त्यामुळे शहर व उपनगरातील कचरा संकलन, खोदाई, वाहतुकीची सर्व कामे ठप्प झाली तरी मनपाचे अधिकारी त्या ठेकेदारावर कारवाई का करीत नाही? त्या ठेकेदाराचे लांगुनचालन का करता? असा प्रश्न वारे यांनी उपस्थित केला आहे. येत्या दोन दिवसांत मनपाने जेसीबीच्या वाहनांवर ड्रायव्हर उपलब्ध न केल्यास प्रभाग दोनमधील नगरसेवकांसह, नागरिक आंदोलन करतील, असा इशारा निखिल वारे यांनी दिला.

मनपा प्रशासनास जाग

पत्रक प्रसिद्धीस देण्यापूर्वी वारे यांनी मनपाच्या अधिकार्‍यांना कल्पना दिली. आंदोलनाच्या धसक्याने मनपा यंत्रणा खडबडून जागी झाली. लगेच जेसीबीवर वाहन चालक देऊन कामास सुरुवात केली. पण त्यामध्ये सातत्य राहिले पाहिजे, असे वारे यांनी म्हटले.

 

Back to top button