सोनगाव, धानोरे परिसरात घरातून चोरी | पुढारी

सोनगाव, धानोरे परिसरात घरातून चोरी

धानोरे : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्यातील धानोरे व सोनगाव येथील बंद असलेल्या तीन वेगवेगळ्या घरांमध्ये एकाच रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत लाखोंचा ऐवज लंपास केला. याबाबत अधिक माहिती अशी की, धानोरे येथील चणेगाव रोडलगत वास्तव्यास असलेले राजेंद्र बोकंद हे शिक्षक कुटुंब बाहेरगावी असल्याने त्यांच्या घराला बाहेरून कुलूप होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या इमारतीत प्रवेश करत घरातील सामानाची उचकापाचक करत 15 हजार रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम तसेच शेजारीच असलेल्या त्यांच्या वडिलांच्या खोलीतील रोख रक्कम 3 हजार असा एकूण 21 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

यानंतर चोरट्यांनी सोनगाव येथील पंचवटी मंडपचे महंमद तांबोळी यांचे मंडप सामानाचे गोडाऊन फोडून महागड्या वस्तू गायब केल्या. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा अनापवाडीकडे वळवून सोनगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष हरकुदास अंत्रे यांच्या घरातून अडीच तोळे सोने व 23 हजारांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला. यावेळी हरकुदास अंत्रे हेही बाहेरगावी होते. या घटनेची खबर सोनगावच्या कामगार पोलिस पाटील अनिता अंत्रे यांनी राहुरी पोलिसांना दिली. यानंतर सात्रळ बीटचे हे.कॉ. सोमनाथ जायभाय यांनी घटनास्थळी दाखल होत सदर घटनेचा पंचनामा केला.

याबाबत अधिक तपास राहुरी पोलिस करत आहेत. यापूर्वीही या परिसरात अशा प्रकारच्या चोर्‍या झालेल्या असून त्यांचा कुठलाही तपास अद्यापि लागलेला नाही. त्यामुळे या परिसरात यापूर्वी सुरू असलेली पोलिस गस्त बंद असून ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button