लोहसरमध्ये काका-पुतण्यांना लुटले | पुढारी

लोहसरमध्ये काका-पुतण्यांना लुटले

करंजी : पुढारी वृत्तसेवा :  गावातून मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वस्तीवरील घराकडे जात असताना लोहसरमधील दोघा तरुणांना मारहाण करीत लुटले. सोमवारी रात्री ही घटना घडली. लुटीच्या या घटनेप्रकरणी पाथर्डी पोलिसांत करंजी येथील तीन तरुणांसह खांडगावच्या एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहसर येथील संदीप सुभाष गीते यांनी पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनाच मारहाण करत लुटले. सोमवारी संदीप गीतेव त्यांचे चुलत भाऊ देवेंद्र हे दोघे मोटरसायकलवरून गावातून वस्तीवर जात होते.

सलमान पठाण, नदीम पठाण, ऋषिकेश लगड (सर्व रा.करंजी) आणि ओंकार वांढेकर (रा.खांडगाव) हे पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनातून आले. त्यांनी कार मोटारसायकलला आडवी लावत दमदाटी करत मारहार केली. त्यात संदीप गीते यांच्याकडील वीस हजार आणि देवेंद्र यांच्याकडील 38 हजार रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अरविंद चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांकडून आरोपींचा शोध
करंजी घाट परिसरात नेहमी रस्ता लुटीच्या घटना घडतात. लुटीच्या या घटना ताज्या असतानाच लोहसरजवळ देखील मध्यरात्री लुटीची घटना घडली. दरम्यान रस्ता लुटीतील आरोपींची नावे समोर आल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलीस करंजीत शोध घेत आहेत.

 

Back to top button