मंत्री विखेंच्या मतदार संघात पवारांचा वार | पुढारी

मंत्री विखेंच्या मतदार संघात पवारांचा वार

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या राजकीय भूमिकेचा ‘पॉवर’ अनेकदा पॉवरफुल असल्याचे बघावयास मिळाले आहे. त्यामुळे सध्या राज्यात सुरू असलेल्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार शिर्डी येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी मंथन वेध भविष्याचा कार्यकर्ता मेळाव्यात काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यांनी मुंबई येथील ‘ब्रीच कॅन्डी’ रुग्णालयात उपचार सुरू असताना सर्व राजकीय घडामोडींचा बारकाईने अभ्यास करून दोन्ही हाताला असलेले सलाईन तात्पुरते बाजुला सारून डॉक्टरांच्या फौज फाट्यासह शिर्डीतील मंथन शिबिरास उपस्थिती लावली.

त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल द्विगुणीत तर केलेचं, पण आपले पारंपरीक राजकीय विरोधक राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी येथील विधानसभा मतदार संघात सहकारावर जोरदार ‘वार’ केला आहे. त्यामुळे शिर्डी येथील शिबीर राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात नंबर एकचा पक्ष बनविण्यासाठी दिशादर्शक ठरले असले तरी विखे पाटील यांच्या सहकारातील योगदानाबद्दल वादग्रस्त ठरले आहे.

राज्याच्या अतिशय अस्थिर राजकीय वातावरणात नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय मंथन शिबीर शिर्डी येथे संपन्न झाले. या शिबिराच्या पुर्व संध्येला राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिर्डी येथील शिबिरानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावती निवडणूका होणार असून शिवसैनिकांनी तयारीला लागा असा आदेश दिला. त्यामुळे साईबाबांच्या पावन शिर्डी नगरीत जमलेल्या कार्यकर्त्यांच्या भावनांना उजाळा मिळून पुढच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून अजित पवार उपस्थिती लावणार काय? याबद्दलचा आशावाद निर्माण झाला.

या शिबिराच्या समारोपाच्या भाषणात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पवारांनी प्रकृतीच्या कारणामुळे मोजक्या शब्दात दिशा देवून आपल्या भाषणाचा सविस्तर भाग राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना वाचायला सांगितला. वळसे पाटील पवार साहेबांचे भाषण वाचत असतांना, शरद पवारांनी वयाच्या बाराव्या वर्षी वडील बंधु आप्पासाहेब पवार यांचे बरोबर प्रवरानगर येथे रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयामधून एक वर्ष शिक्षण घेतले. त्यावेळी गोवा मुक्ती मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यालय बंद केले.

विद्यार्थ्यांचे नेतृत्व करून सार्वजनिक जीवनातील पहिले आंदोलन छेडले असल्याचे सांगितले. त्याबरोबर अहमदनगर जिल्ह्यासह राज्य व देशात कशा पद्धतीने स्थित्यंतर घडले, याचा इतिहास कार्यकर्त्यांसमोर उभा केला. त्यांच्या भाषणामुळे राजकारण व समाजकारणात शरद पवार यांची उंची उपस्थितांच्या जशी लक्षात आली. तशी पक्षासाठी झोकून देवून काम करण्याची प्रेरणाही मिळाली.

परंतु शरद पवार यांच्या आजपर्यंतच्या भाषणात प्रत्येक वाक्य व शब्दामागे मोठा भावार्थ दडलेला असतो, हे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना नव्याने सांगण्याची गरज नाही. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आदिक यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी श्रीरामपूर येथे आयोजित सभेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण मला समजलेले नाही. या जिल्ह्यात उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे. त्यापेक्षा जो ‘सोधा’ (सोयरे-धायरे) पक्षाचा असेल तर निवडून येतो असा उच्चार करून अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणाबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते.

म्हणूनच शिर्डीच्या मंथन शिबिरात शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नंबर एकवर घेवून जाण्याचे जसे आवाहन केले. तसेच येथील सहकारी साखर कारखानदारीचा उदय ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ व वैकुंठभाई मेहता यांच्या नेतृत्वाखाली झाला. त्यावेळी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व आण्णासाहेब शिंदे यांनी सहकार्य केल्याचे सांगितले. त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या असून पवारांचे हे वाक्य वादग्रस्त ठरले आहे.

सहकारी साखर कारखानदारीची चर्चा !
राज्यातील सहकारी चळवळ देशाच्या आर्थिक कणा म्हणून संबोधली जाते. दरम्यान, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तम स्थितीतील सहकारी साखर कारखाने तोट्यात दाखवून खरेदी केले. सहकाराचे खासगीकरण करणारे पवार काका-पुतण्यांच्या भूमिकेबद्दल राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील कार्यक्रमात आश्चर्य व्यक्त केले. तसेच विखे पाटील कुटुंबियांनी सहकार जपला तो वाढविला. त्याचेच फळ जिल्ह्यासह राज्यातील राजकर्ते चाखत असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. त्यामुळे सहकाराबद्दल विखे-पवार कुटुंबामध्ये सुरू असलेली चर्चा शेतकर्‍यांसाठी मंथनाचा विषय ठरली आहे.

…तर पवारांची उंची घटेल : ताके
आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुढाकारातून प्रवरानगर येथे सुरू झाला. तो पाहण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू प्रवरानगरला आले. नेहरूंच्या मागणीवरून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी डॉ. आण्णासाहेब शिंदे यांना दिल्लीला पाठविले, हा खरा इतिहास आहे. पण पद्मश्री विखे पाटलांबद्दलची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका त्यांची उंची कमी करणारी ठरेल, असे मत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते सुरेश ताके यांनी व्यक्त केले.

Back to top button