नगर : गुरुजींना दरमहा साडेपाच कोटी घरभाडे! | पुढारी

नगर : गुरुजींना दरमहा साडेपाच कोटी घरभाडे!

नगर; पुढारी वृत्तसेवा: शिक्षक हे मुख्यालयात राहत नसल्याने त्यांचे घरभाडे बंद करावे, अशी मागणी भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी उचलून धरली होती. औरंगाबादला अशाप्रकारे सप्टेंबरच्या पगारात घरभाडे कपात झाले असले, तरी नगरला मात्र कोणतीही झळ न बसल्याने गुरुजींना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

नगरमध्ये जिल्हा परिषदेच्या 4500 पेक्षा अधिक शाळा असून, 10 हजार 959 शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांचे राज्य शासनाकडून दरमहा वेतन केले जाते. यात गुरुजींना 35 हजारांपासून 60 हजारापर्यंत वेतन आहे. यातील मूळ वेतनाच्या 9 टक्के प्रमाणे गुरुजींना घरभाडेपोटी पगारात रक्कम दिली जाते. साधारणतः चार ते पाच हजारांची ही रक्कम समाविष्ट असते. नगर जिल्ह्यासाठी पाच कोटी 36 लाख 86 हजार 969 रुपये घरभाडे म्हणून शासन दरमहा अदा करते.

मध्यंतरी भाजपाचे आमदार बंब यांनी शिक्षक हे मुख्यालयात थांबतच नसल्याने शिक्षकांना घरभाडे देऊ नये, अशी विधानसभेत मागणी केली होती. त्यानंतर ठिकठिकाणी आमदार बंब आणि शिक्षक संघटनांमधील संघर्ष चिघळताना दिसला. यात, सरकारने जर भाडेबंद करण्याचा निर्णय घेतला, तर शिक्षकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने याविषयी मोठी अस्वस्थता पाहायला मिळाली. मात्र, राज्यात शिक्षकांची संख्या निर्णायक आहे.

त्यामुळे यांना दुखावण्याचे धाडस सरकारने अद्यापि दाखवलेले नाही. त्यामुळे तूर्तास आमदार बंब आणि इतर संघटनांनी गुरुजींच्या भाडेबंदीबाबत केलेल्या मागणीकडे सरकारने सपशेल दूर्लक्ष केल्याचे दिसते. सप्टेंबरमधील पगार हा घरभाड्यासह अदा करण्यात आला आहे. तर आता ऑक्टोबरचा पगारही घरभाड्यासह मिळेल, असा विश्वास गुरुजींना आहे.

दरम्यान, गुरुजी म्हणजे गावचा चेहरा असून, त्यांचे योगदान विसरून चालणार नाही. त्यामुळे या घटकासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील गुरुमाऊली, गुरुकुल, सदिच्छा, रोहोकले प्रणित गुरुमाउली, शिक्षक परिषद, इब्टा, ऐक्य, स्वराज्य, शिक्षक भारती, दिव्यांग शिक्षक संघटना, एकल आदी संघटनांनी स्वागत केले आहे.

औरंगाबादमध्ये कपात; नगरमध्ये आदेश नाहीत शेजारील औरंगाबाद जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याचा पगार काढताना शालार्थ प्रणालीत घरभाडे भत्ता सामाविष्ट करू नये, असे गटशिक्षणाधिकार्‍यांना निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे तेथील शिक्षकांना सप्टेंबरमध्ये घरभाडे मिळाले नाही. नगरमध्ये मात्र अशाप्रकारे शासनाकडून कोणतेही आदेश प्राप्त झालेले नसल्याने सप्टेंबरमधील पगारात घरभाडे प्राप्त झालेले आहे. आता ऑक्टोबरच्या पगाराकडे गुरुजींचे लक्ष असणार आहे.

Back to top button