नगर : प्राथ. शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी कोण? विकास मंडळासाठीही रस्सीखेच | पुढारी

नगर : प्राथ. शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी कोण? विकास मंडळासाठीही रस्सीखेच

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 11 हजार शिक्षकांच्या जिव्हाळ्याची संस्था असलेल्या शिक्षक बँक आणि विकास मंडळाच्या नूतन पदाधिकार्‍यांची गुरुवार दि. 3 नोव्हेंबर रोजी निवड केली जाणार आहे. दरम्यान, बँकेच्या चेअरमन पदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असले, तरी गुरुमाऊलीचे नेते बापूसाहेब तांबे यांची कोअर कमेटी नेमकी कोणाला संधी देणार, याविषयीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. शिक्षक बँकेची चौरंगी लढत झाली. यात सत्ताधारी गुरुमाऊलीचे नेते बापूसाहेब तांबे यांनी 21 पैकी 20 जागांवर मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा बँकेची सत्ता काबीज केली. तर विरोधी गटाचे नेते डॉ. संजय कळमकर यांच्या गुरुकुलला एक जागेवर समाधान मानावे लागले. तसेच ज्येष्ठ शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले आणि राजेंद्र शिंदे यांच्या गटाला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र रोहोकले गटाने दुसर्‍या क्रमांकांची मते मिळवत आपली ताकद दाखवून दिली. तर शिंदे गटानेही अपेक्षेपेक्षा जास्त मते खेचल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान, शिक्षक बँकेच्या चाव्या तांबे गटाकडे आल्यानंतर आता चेअरमन पदी कोणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागले आहे. यात नेवाशाला मागच्या मंडळात कोणतेही पद मिळालेले नाही, त्यामुळे कदादित संचालक चोपडे यांना संधी मिळू शकते. डॉ. संजय कळमकर या दिग्गज शिक्षक नेत्यांचा त्यांनी पराभव केला केला आहे. त्यामुळे चोपडे यांना चेअरमनपदाची बक्षिसी दिली जाऊ शकते. दुसरीकडे संगमनेरचे भाऊराव राहींज हे सर्वाधिक मतांनी विजयी झालेले आहे. मताधिक्याचा विचार केला, तर त्यांचा चेअरमन पदासाठी पहिलाच नंबर लागावा, असा समर्थकांचाही दावा लपून राहिलेले नाही. बापूसाहेब तांबे यांचे होमग्राऊंड असलेल्या पारनेरचे कारभारी बाबरही चर्चेत आहेत. त्यांनी प्रविण ठुबे या दिग्गजाचा पराभव केला आहे. तांबेंना हा आनंद द्विगुणित करण्यासाठी कदाचित बाबर यांची लॉटरी लागू शकते.

उच्चशिक्षीत आणि स्वभावाने शांत असलेले शेवगावचे रमेश गोरे, श्रीगोंद्याचे संदीप मोटे आणि राहुरीचे गोरक्षनाथ विटनोर ही नावेही स्पर्धेत आहेत. याशिवाय बँकेत 5 हजारापेक्षा अधिक महिला सभासद आहेत, त्यामुळे चेअरमन पदी महिलेला संधी दिल्यास नगरचा एक वेगळाच आदर्श राज्यासमोर जाऊ शकतो, हेही विसरून चालणार नाही. एकीकडे स्पर्धक वाढत आहेत. त्यांच्यामध्ये रस्सीखेचही सुरू आहे. मंडळाच्या नेत्यांकडे लॉबिंगही सुरू असल्याचे कानावर येत आहे. मात्र, तांबे आणि त्यांची ओकर कमेटी चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदी अखेरच्या क्षणी कोणाची निवड करणार, हे मात्र 3 तारखेलाच समजणार आहे.

आम्हाला सर्व संचालक सारखेच आहेत. त्यामुळेच आमच्याकडे चेअरमनला जे अधिकार असतात, तेच अधिकार संचालकालाही असतात. बँक आणि विकास मंडळाच्या अध्यक्ष निवडीबाबत आमची कोअर कमेटी अंतिम निर्णय घेईल. सध्या अनेक नावे चर्चेत असली, तरी कोणाचेही नाव निश्चित झालेले नाही.
-बापूसाहेब तांबे,
नेते, गुरूमाऊली मंडळ

विकास मंडळासाठीही होणार निवडी
बापूसाहेब तांबे यांनी बँकेसोबत विकास मंडळही ताब्यात घेतलेले आहे. 3 नोव्हेंबरलाच विकास मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि सेके्रटरीची निवड केली जाणार आहे. या ठिकाणी अध्यक्ष पदासाठी पारनेरचे प्रल्हाद भालेकर, कोपरगावचे विलास गवळी, अकोल्याच्या अनिता उगले आणि संगमनेरच्या मनिषा गाढवे, तर ऐक्यचे निमसे यांची नावे चर्चेत आहेत.
मात्र, बँकेत ज्या तालुक्यांचे चेअरमन आणि व्हा. चेअरमन होणार आहे, त्या तालुक्यांना विकास मंडळात संधी नाही, हे नक्की आहे. त्यामुळे मंडळावर तांबे हे कदाचित महिला नेतृत्वाला संधी देऊ शकतात, अशी चर्चा आहे.

Back to top button