कोळपेवाडी : रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या | पुढारी

कोळपेवाडी : रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा: मागील दोन वर्ष जीवघेण्या कोरोना महामारीत आरोग्य विभागाला केलेल्या सर्वतोपरी मदतीतून आरोग्य विभागाने कोरोना महामारीवर नियंत्रण ठेवून नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवले. यापुढील काळातही ग्रामीण रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना चांगल्या सोयी-सुविधा देऊन रुग्णांच्या तक्रारी येणार नाहीत, याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन ग्रामीण रुग्णालयामार्फत रुग्णांना देण्यात येणार्‍या विविध सेवांचा आढावा घेतला. यावेळी अधिकार्‍यांना येणार्‍या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. वैद्यकीय अधिकार्‍यांशी वार्तालाप करताना आ. काळे म्हणाले, ग्रामीण रुग्णालयात येणारा रुग्ण सर्वसामान्य कुटुंबातील असतो.

खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अशा रुग्णांना शासनाच्या माध्यमातून मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. ज्या अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात येण्यास खासगी वाहनाची व्यवस्था होऊ शकत नाही त्यांना रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध करून द्या.

प्रसुतीस आलेल्या गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन सर्व सुविधा उपलब्ध करून द्या. सर्व मोफत शस्त्रक्रियांचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना कसा मिळवून देता येईल, यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना त्यांनी केल्या. या बैठकीस रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ. अजय गर्जे, अधीक्षक डॉ. संजय यादव, डॉ. कृष्णाजी फुलसुंदर आदी उपस्थित होते. दरम्यान, या सूचनांची अंमलबजावणी करू, अशी ग्वाही वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली.

Back to top button