नगर : प्रभागातील कचरा सोशल मीडियावर! मनपा अधिकारी खुर्च्या उबवायला आलेत का : निखिल वारे | पुढारी

नगर : प्रभागातील कचरा सोशल मीडियावर! मनपा अधिकारी खुर्च्या उबवायला आलेत का : निखिल वारे

नगर; पुढारी वृत्तसेवा: सावेडी उपनगरातील प्रभाग 2 मधील कचरा संकलन प्रश्न सुटण्याऐवजी अजून गंभीर होत चालला आहे. वसंत टेकडी, श्रीराम चौक, श्रीकृष्णनगर, वीर सावरकर मार्ग, शिलाविहार अशा परिसरात ठिकठिकाणी साचलेला कचरा, सुंदर रस्त्यांवर अस्वच्छता, प्रभागातील ही कचरा समस्या अखेर सोशल मीडियावर फोटोसह व्हायरल करून मनपा प्रशासनाला माजी नगरसेवक निखिल वारे यांनी संतप्त सवाल केला असून, याची सर्वत्र चर्चा होत आहे.

वारे यांनी सांगितले की, स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नगर शहरात मोठ्या प्रमाणावर अभियान राबविण्यात आले होते. कचराकुंड्या हटवून घंटागाड्या सुरु केल्या. साचलेला कचरा हटविला. मनपाच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ दिली आणि शहर स्वच्छ होऊन थ्री स्टार मानांकन मिळाले होते. आता मात्र सावेडी परिसरात एकही भाग असा नाही की तेथे कचरा नाही. प्रभाग 2 मधील काही भागातील फोटो वारे यांनी सोशल मीडियावर व्हायरल करीत, मनपा प्रशासनाला काही प्रश्न उपस्थित करून धारेवर धरले आहे.

कचर्‍याच्या फोटोपुढे हेच अहमदनगर महापालिकेचे थ्री स्टार मानांकन का? कचरा संकलन ठेकेदार मनपाच्या अधिकार्‍यांना जुमानत नाही का? अधिकारी फक्त खुर्च्या उबवायला आलेत का? सर्व कामे नगरसेवकांनीच करायची का? हेच महाराष्ट्रातील 6 नंबरचे स्वच्छ शहर आहे का? असे प्रश्न मनपाला विचारले आहेत. याची चर्चा प्रभागात सुरु असून, यावर मनपा प्रशासन काय उत्तर देते? की निरुत्तर राहून प्रत्यक्षात स्वच्छता मोहीम राबविते, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. कचर्‍याच्या समस्येमुळे ‘स्वच्छ शहर, सुंदर प्रभागाला’ मात्र ग्रहण लागले आहे. ते कधी सुटेल, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Back to top button