‘जैविक भारत’मध्ये भेंडी उत्तीर्ण ; पिंपरी जलसेन येथील शेतकरी गटाचे 25 एकरावर उत्पादन | पुढारी

‘जैविक भारत’मध्ये भेंडी उत्तीर्ण ; पिंपरी जलसेन येथील शेतकरी गटाचे 25 एकरावर उत्पादन

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन या गावातील शेतकर्‍यांची भेंडी ‘जैविक भारत’मध्ये उत्तीर्ण झाली असून, कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर झालेला नसल्याचे सिद्ध झाले आहे. श्री रोकडोबा शेतकरी गटाने भेंडी पीक एकत्र पिकविले असून, प्रथमच 25 एकरावर मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर व नगर तालुक्यात पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धा सुरू आहे. यामध्ये जवळपास 145 गटांनी सहभाग घेतला असून, पारनेर तालुक्यात 46 गट स्पर्धेत उतरले आहेत. पिंपरी जलसेनचा रोकडोबा शेतकरी गट देखील स्पर्धेत घोडदौड करत आहे. मूल्यांकन पद्धतीनुसार गटाने एकत्र येऊन काम केले आहे. गटाने कोणतेही रसायन न मारता जीवामृत, दशपर्णी अर्क, निमार्क, चिकट सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे अशा पद्धतींचा अवलंब केलेला आहे. अशा भेंडीला दरही चांगल्या पद्धतीने मिळत आहे. शेतकर्‍यांचा भांडवल खर्च निघून शेतकरी नफ्यामध्ये आहे.

मागील महिन्यात गटाने टी. यू. व्ही. नॉर्ड या संस्थेमार्फत भेंडी तपासणी केली होती. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर गटाने तिथेच न थांबता, पुढील तपासणी ‘जैविक भारत’ला केली. त्यामध्ये देखील भेंडी उत्तीर्ण झाली. शेतकर्‍यांनी गटाने एकत्र येऊन केलेल्या शेती चा फायदा दिसून येत आहे. एकट्याने शेती न करता गटाने शेती केली तर, नक्कीच शेतीमध्ये चांगले दिवस पाहायला मिळतील. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून 36 पिके स्पर्धेमध्ये घेतली आहेत. प्रत्येक पिकाची कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेतकरी गटांसाठी शेती शाळा घेतली जाते. यामध्ये शेतकरी गट आपापले प्रश्न थेट शास्त्रज्ञांना विचारतात. त्यामुळे शेतकर्‍यांना अधिकृत उत्तर मिळते.

पिंपरी जलसेन गावाने 2019 मध्ये याच वॉटर कप स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला होता. मनसंधारणातून जलसंधारण झाल्यानंतर आता आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी गटाने एकत्र येऊन शेती करत आहेत. स्व:कष्टाच्या बळावर मिळविलेल्या पाण्याचे नियोजन करून शेतकर्‍यांची समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे.

फार्मर कप अंतर्गत शेतकर्‍यांना जैविक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रेरित केले जात आहे. शेतकरी सक्षम झाला पाहिजे. त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे हे स्पर्धेचे उद्दिष्ट आहे व यातून शेतकरी समृद्ध होताना दिसत आहे.
– डॉ.अविनाश पोळ, मुख्य मार्गदर्शक, पाणी फाउंडेशन

Back to top button