अकोले: सरकारने जाहीर केलेल्या शिधा किटची अद्याप प्रतीक्षाच | पुढारी

अकोले: सरकारने जाहीर केलेल्या शिधा किटची अद्याप प्रतीक्षाच

अकोले, पुढारी वृत्तसेवा: गोरगरिबांची दिवाळी ही गोड व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून केवळ शंभर रुपयांत डाळ, साखर, रवा आणि पामतेल प्रति एक किलो असे किट देण्याची घोषणा केली आहे. मात्र अकोले पुरवठा विभागाकडे यापैकी काही साहित्य अद्याप पोहोचले नसल्याने तालुक्यातील जनतेची दिवाळी गोड होणार की कडू असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित होत आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय आणि अन्न सुरक्षा तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशनकार्डधारकांना येणाऱ्या दिवाळीला दिलासा मिळावा यासाठी नियमित धान्य सोडून साखर, तेल, रवा हरभरा डाळ प्रति किलो देण्यात येणार आहे. त्यासाठी एकत्रित किट करुन ते लाभार्थ्यांना वाटप करण्याच्या सूचना शासनाच्या पुरवठा विभागाने केल्या आहेत. त्यासाठी नेमण्यात आलेल्या पुरवठा ठेकेदारांना हे प्रति किलोचे पाकीट करून त्याचे एकत्रित किट करून ते रेशन दुकानावर पोहोच करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु अकोले तहसील पुरवठा विभागाच्या गोडावनला फक्त १५ हजार किलो रवा पोहोच झाला आहे. मात्र पामतेल, साखर आणि चना डाळीची अद्याप प्रतीक्षाच आहे.

दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील जवळपास ४१ हजार ८०० लाभार्थ्यांना हे किट वाटप करण्यात येणार आहे. मात्र, गोडावनलाच अद्याप साहित्य पोहोचलेले नाही. त्यामुळे ते लाभार्थ्यांपर्यंत दिवाळीपूर्वी पोहोचणार का, याविषयी आता साशंकता निर्माण झाली आहे. त्यासाठी अकोले पुरवठा विभागाची डोकेदुखी वाढली आहे. साहित्यच अद्याप गोडावनमध्ये आले नाही तर मग किट तयार कोणी करायचे आणि त्याचे वाटप कधी करायचे, असा प्रश्न पुरवठा विभागासमोर उभा राहिला आहे.

गोडावनला येणारे साहित्य थेट गोण्यांमधून येत आहे. त्यामुळे त्याचे किट कोणी तयार करायचे, असा प्रश्न आता नव्याने उपस्थित झाला आहे. त्यामुळे हे किट तयार करण्याचे काम आता रेशन दुकानदारांच्या माथी मारणार की काय, या धास्तीने आता रेशन दुकानदारही हवालदिल झाले आहेत. अकोले तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पिके धोक्यात आली आहेत. सरकारचे साखर, तेल, रवा हरभरा डाळ किट सर्वसामान्य पर्यंत पोहोचल नसल्याने आदिवासी भागातुन नाराजीचा सुर उमटत आहे.

Back to top button