अकोले : दुचाकी चोरणारी टोळी केली गजाआड | पुढारी

अकोले : दुचाकी चोरणारी टोळी केली गजाआड

अकोले : पुढारी वृत्तसेवा : अकोले पोलिसांनी मोठी कारवाई करत मोटरसायकल, इलेक्ट्रिक मोटारी तसेच मंदिराच्या दानपेट्या फोडून चोरी करणारी टोळी पकडून सात चोरांकडून 16 मोटरसायकली, पाच इलेक्ट्रिक मोटरीसह चोरीतील 3 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोले पोलिस ठाणेच्या हद्दीत विविध ठिकाणी चोर्‍यांचे प्रमाण वाढले होते. रात्रीच्या वेळी घरफोडी, वाहन चोरी, मंदिरात चोरी करणारी टोळी कार्यरत झालेली होती. चोर्‍यामुळे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते.

यावेळी अकोले पोलिसांनी ही टोळी पकडण्यासाठी व गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी हिस्ट्री शिटर चेक करणे, टु- प्लस मधील आरोपींच्या वास्तव्याबाबत माहिती घेणे, नाकाबंदी, पेट्रोलिंग करणे अश्या प्रकारच्या समांतर कारवाई सुरु केल्या होत्या.
सदर कारवाई सुरु असताना व हद्दीत गस्त सुरु असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांना गुप्त बातमीदराकडून मिळालेल्या माहितीनुसार सागर विश्वनाथ मेंगाळ, हर्षल संजय मेंगाळ (दोघेही रा. केळी- रुम्हणवाडी ता. अकोले) या दोघे इलेक्ट्रीक मोटार व मोटार सायकल चोरी करुन त्याची विल्हेवाट लावणार असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने या दोन इसमांना अकोले पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे तपास असता तपासात त्यांचे साथीदार सोमनाथ शिवाजी भुंताबरे, सुभाष रघुनाथ आगविले (रा. चिंचाचीवाडी, समशेरपुर ता. अकोले), भास्कर खेमा पथवे (रा. नांदुरी दुमाला ता. संगमनेर), दिलीप पांडुरंग मेंगाळ केळी -रुम्हणवाडी (ता. अकोले) हे या चोर्‍यामध्ये सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेने संबंधित इसमांना ताब्यात घेतले.

Back to top button