नगर : बर्फी खाल्ल्याने उलट्या जुलाब ; सावेडीतील मिठाई दुकानाची अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी | पुढारी

नगर : बर्फी खाल्ल्याने उलट्या जुलाब ; सावेडीतील मिठाई दुकानाची अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी

नगर : पुढारी वृत्तसेवा : सावेडी उपनगरातील एका मिठाई दुकानातील बर्फी खाल्ल्याने उलट्या जुलाब झाल्याने एकाच कुटुंबातील दोघांना रुग्णालयात दाखल केले. याबाबत दुकानदाराला जाब विचारला असता त्याने अरेरावीची भाषा वापरली. अखेर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी त्या मिठाई दुकानाची तपासणी केली. अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवरील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानातून अभिजीत दरेकर यांनी काल रात्री मलई-बर्फी खरेदी करून ते घरी घेऊन गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी बर्फी खाल्ल्यानंतर अचानकपणे रात्री कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यांना एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

दरेकर यांनी आणलेल्या मलई-बर्फीचा वास येत असल्याने आज सकाळी त्या दुकानदाराकडे तक्रार करण्यासाठी गेले होते. परंतु, तक्रार ऐकून घेण्याऐवजी दुकानदाराने अरेरावीची भाषा वापरली. याप्रकरणी अभिजित दरेकर यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी शरद पवार यांनी तत्काळ पाईनलाईन रस्त्यावरील त्या मिठाई दुकानात जाऊन खाद्या पदार्थांची तपासणी केली. त्यातील खाद्या पदार्थांचे नमुणे तपासणीसाठी घेतले. तसेच, अभिजीत दरेकर यांनी घेतलेली मलई-बर्फी अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतली.

सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावरील त्या मिठाईच्या दुकानातील खाद्या पदार्थांची तपासणी केली असून, लॅबला पाठविण्यासाठी नमुणे घेतले आहेत.
                          -संजय शिंदे, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी केवळ दोनच पदार्थ तपासणीसाठी घेतले आहेत. दुकानातील सर्वच पदार्थांची तपासणी होणे गरजेचे आहे. ऐन सणासुदीत हा प्रकार सामान्य माणसाच्या जीवावर बेतू शकतो.
                                                                       -अभिजित दरेकर, तक्रारदार

Back to top button