शिक्षक बँक निवडणूक : तेवढ्या ‘भानगडी’ काय काढू नका राव ! उमेदवार झाले हवालदिल | पुढारी

शिक्षक बँक निवडणूक : तेवढ्या ‘भानगडी’ काय काढू नका राव ! उमेदवार झाले हवालदिल

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक बँक सभासदांच्या आर्थिक हितासाठी आपण काय करणार, याचे नियोजन सांगण्याऐवजी मंडळाच्या नेत्यांच्या वैयक्तिक बाबी तसेच उमेदवारांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींना आता उजाळा दिला जात आहे. यातूनच काही प्रकरण बाहेर आली आहेत, तर उर्वरित दहा दिवसांमध्ये आणखी काही प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे. याच गोष्टीची कुणकुण लागल्याने अनेक  उमेदवार हवालदिल झाले आहेत. त्यांनी विरोधी नेत्यांच्या छुप्या गाठीभेटी घेऊन कृपा करून असं काही करू नका, अशा विनवण्या सुरू केल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

कोपरगावच्या शिक्षक नेत्याचे प्रकरण आणि त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरल्याची चर्चा आहे. त्यानंतर संगमनेरचे एक तंत्रस्नेही उमेदवाराचे प्रकरण राज्यात गाजले आहे. दुसरीकडे एका तालुक्यातील एक तंत्रस्नेही उमेदवारसुद्धा खूप चर्चेत आहे. त्यांनी सुद्धा शाळेच्या ऑनलाईन कामाच्या निमित्ताने दोन-तीन तालुक्यात केलेले ‘कृष्णकृत्य’ चर्चेचा विषय आहेत. विरोधी गटातील उमेदवार देखील या गोष्टीचा फायदा घेण्याच्या विचारात असून प्रचारात ‘हा’ एक मुद्दा बनविण्याचाही प्रयत्न केला जात आहे.

कधीकाळी शिक्षक बँकेची निवडणूक ही मुद्द्यांवर लढली जात होती. बँकेमध्ये कारभार कसा झाला, तो कसा व्हायला पाहिजे होता, याचे विश्लेषण केले जात होते. भविष्य काळामध्ये सभासदांना आपण काय देणार आहोत, याची चर्चा केली जात होती. परंतु यावेळी मात्र दिशा भरकटत आहे. आरोपांची चिखलफेक सुरू आहे. फोडाफोडीला जोर आला आहे. शाळेकडेही ‘गुरुजीं’चे लक्ष नाही, झेडपीचे अधिकारीही गुरुजींच्या राजकीय युद्धाची मजा घेत आहेत. हे सर्व सुरू असताना आपण शिक्षक आहोत, समाजापुढे आपण आदर्शानेच गेलं पाहिजे, याचा विसर देखील अनेक गुरुजींना पडल्याचे वास्तव आहे.

Back to top button