अकोले : ‘अगस्ती’ कुणाकडे..पिचड की लहामटे? कारखाना निवडणुकीचा आज होणार फैसला | पुढारी

अकोले : ‘अगस्ती’ कुणाकडे..पिचड की लहामटे? कारखाना निवडणुकीचा आज होणार फैसला

अकोले : पुढारी वृत्तसेवा : अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड हे सत्ता कायम राखणार की आ.डॉ. किरण लहामटे सीताराम गायकर व अशोक भांगरे हे सत्ता काबिज करणार, याचा फैसला आज (दि.26) होणार आहे. रविवारी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी एकूण 8392 पैकी 7165 (85.36 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 2022 ते 2027 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.25) सकाळी 8 ते 5 या वेळेत तालुक्यातील 9 गावांत 9 मतदान केंद्रांवरील 23 मतदान बुथवर मोठ्या पोलिस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 8342 सभासद व 50 उत्पादक व बिगर उत्पादक पणन संस्था प्रतिनिधी अशा एकूण 8392 मतदारांपैकी एकूण 7165 (85.36 टक्के) मतदान केले. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या निगराणीत व पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत.

सोमवारी (दि. 26) सकाळी 9 वाजता अकोले महाविद्यालयाच्या कै. के. बी. दादा सभागृहात मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी 22 टेबल असून, फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार आहे. चार फेर्‍यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी जी. जी. पुरी यांनी दिली.माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांचे शेतकरी विकास मंडळ व आ. डॉ. किरण लहामटे, कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, अशोक भांगरे यांच्या शेतकरी समृद्धी मंडळात चुरशीची लढत झाली. अगस्तीची सत्ता पिचड कायम राखणार की विरोधक बाजी मारणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Back to top button