जेऊरला ढगफुटी; नगरात सीनेला पूर | पुढारी

जेऊरला ढगफुटी; नगरात सीनेला पूर

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात मंगळवारी (दि. 20) सर्वदूर जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील बहुतांश तलाव भरले असून, नद्यांना पूर, तर ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे नगर शहरातून वाहणार्‍या सीना नदीला पूर आला होता. पुराचे पाणी नदीपात्रालगतच्या घरामध्ये शिरुन लोकांना रात्र जागून काढावी लागली. जेऊर परिसरातील डोंगरगण, इमामपूर, पिंपळगाव माळवी परिसरात ढगफुटी सद़ृश्य पाऊस झाला. सीना व खारोळी नदीला पूर आला. जेऊरच्या बाजारपेठेत सीनानदीचे पाणी शिरले होते. चापेवाडी, नाईक वस्ती, शेटे वस्तीवरील नागरिकांचा काही काळ संपर्क तुटला होता. परिसरातील सर्व तलाव, बंधारे तुडूंब भरले असून, ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. इमामपूर तलाव, शेटे वस्ती तलाव, डोणी तलाव, बहिरवाडी येथील वाकीवस्ती तलाव, तसेच पिंपळगाव माळवी तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्याव्दारे पाणी वाहत आहे.

पिंपळगाव तलावाच्या सांडव्यावरून जास्त प्रमाणात पाणी वाहत असल्याने वांबोरी रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. हिच परिस्थिती डोंगरगणमध्ये दिसून आली. वाळकी परिसराला वरदान ठरणारा धोंडेवाडी तलावही ओव्हरफ्लो झाला आहे. भोरवाडी तलाव, कामरगावचा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. काही प्रमाणात बाजरी, कांद्याचे रोप व इतर पिकांचे नुकसान झाले असले, तरी तलाव भरल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नगर तालुक्यासह नगर शहरात पडलेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आला होता. सीना नदी दुथडी भरून वाहिली. नदीपात्रालगतच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. नगर-कल्याण रस्त्यावरील पूल पहाटे पाण्याखाली गेला होता. नागापूर औद्योगिक वसाहतीच्या परिसरातही ढगफुटीसद़ृश्य पाऊस कोसळला.

ओसंडून वाहणारे धबधबे
नगर तालुक्यातील डोंगरगण, मांजरसुंबा गड, इमामपूर येथील खिरणीचा महादेव परिसरातील धबधबा, गुंडेगाव, आगडगाव, ससेवाडी, देवगाव परिसरातील छोटे मोठे धबधबे ओसंडून वाहत आहेत. गर्भगिरीच्या डोंगररांगा हिरव्यागार झाल्या असून, येथील निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत आहे.

लाल कांदा रोपांची वाताहात
सततच्या पावसाने शेतकर्‍यांनी टाकलेल्या लाल कांद्याच्या रोपांची वाताहात झाली आहे. 50 ते 60 टक्के रोपे वाया गेली आहेत. त्यामुळे तालुक्यात पाणी उपलब्ध असूनही लाल कांद्याच्या उत्पादनात घट होणार आहे. मात्र रांगडा कांदा, गावरान कांदा व गव्हाच्या पिकात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

मंगळवारचा मंडलनिहाय पाऊस
मंडल पाऊस एकूण पाऊस
नालेगाव 16 मि.मी. 519 मि.मी.
सावेडी 43 665
कापुरवाडी 24 494
केडगाव 10 630
भिंगार 22 554
नागापूर 40 648
जेऊर 53 598
चिचोंडी पाटील 23 446
वाळकी 17 371
चास 05 454
रुई छत्तीशी 36 511

Back to top button