खेड : नियम धाब्यावर, लालपरी ‘ढाब्या’वर! | पुढारी

खेड : नियम धाब्यावर, लालपरी ‘ढाब्या’वर!

खेड; पुढारी वृत्तसेवा: लालपरी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती शिस्त अन् नियमित वेळ! पण वेळेचे अचूक भान ठेवणारी बस सगळ्या प्रवाशांना ताटकळत ठेवून नाश्ता व जेवणाच्या नावाखाली अधिक वेळ चक्क ढाब्यावर थांबत असेल तर? कुणाला नवल वाटायला नको. असाच प्रकार राशीन-भिगवण राज्यमार्गावर करपडी हद्दीत कायमच घडत आहे.

भिगवण-अमरापूर राज्यमार्गावरून अनेक एस. टी, बस प्रवाशांना घेऊन धावतात. मात्र, याच राज्यमार्गावरील करपडीच्या हद्दीत असलेल्या चौकीच्या लिंबाजवळील एका हॉटेलवर अनेक बस विनापरवाना येऊन थांबतात.अचानकपणे येऊन थांबलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. प्रवाशांनी विचारणा केल्यावर अनेकवेळा प्रवासी व वाहकांमध्ये हुज्जत घातली जाते.

एकीकडे राज्यमार्गावर बसथांबे असतानाही बसची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांनी बसला हात करूनही बस थांबवली जात नाही. नाश्त्याच्या व जेवणाच्या नावाखाली विनापरवाना बस कशी थांबवली जाते? असा सवाल प्रवासी विचारत आहेत.ज्यावेळी बस थांबते त्यावेळी काही प्रवासीही नाश्त्याचा व जेवणाचा आस्वाद घेतात, पण हॉटेल व ढाब्यांनाच अधिकृत परवाना नसल्यास व प्रवाशांना खाण्यातून काही बाधा निर्माण झाल्यास जबाबदार कोण? याचाही विचार होणे गरजेचे आहे. चालक-वाहक केवळ स्वत:च्या फायद्यासाठी प्रवाशांना हॉटेल, ढाब्यांवर महागडी सेवा घेण्यास भाग पाडून एसटीच्या ‘प्रवासी हिताय प्रवासी सुखाय’ या ब्रीदलाच तडा देत आहेत.

एस.टी. च्या उपाहारगृहांना लागली घरघर
परवानगी नसतानाही ढाबे आणि हॉटेलांवर मनमानी थांबा घेऊन प्रवाशांच्या वेळ व पैशांचाही अपव्यय करणार्‍या चालक-वाहकांमुळे बसस्थानकांवरील उपाहारगृहांनाही घरघर लागली आहे. एसटीचा प्रवास सुखाचा आणि समाधानाचा ही संकल्पना लोप पावत चालली आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या अधिकृत थांब्यांवरच बस थांबवाव्यात. विनापरवाना थांब्यावर कुणाच्या आदेशाने आणि परवानगीने बस थांबतात, याचा खुलासा राज्य मार्ग परिवहन महामंडळाने करावा. विनाकारण प्रवाशांना वेठीस धरू नये. याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी.
                                                     -सतीश चव्हाण, सरपंच, आखोणी

Back to top button