प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा : गोंधळच, पण संयमी ! | पुढारी

प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा : गोंधळच, पण संयमी !

नगर :  पुढारी वृत्तसेवा : प्रवास भत्ता, नफा वाटणी, घड्याळ खरेदी, मयत निधी, ‘सावित्रीच्या लेकी’तील घोटाळा, इत्यादी आरोपांच्या मुद्यांवरून ‘21 बोके, सगळे ओके’ची झालेली घोषणाबाजी, सत्ताधार्‍यांनी बँक लुटल्याचा आरोप, सभापतींना खाली बसविण्यासाठी व्यासपीठावर धडकलेले कार्यकर्ते आणि त्यांना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाला हातात माईक घेऊन ‘गुरुजीं’ना द्यावे लागलेले शिस्तीचे धडे, या विषयांवरुन सभेत गोंधळ झालाच, मात्र संयमही दिसून आला. दरम्यान, ही सभा बँकेची की प्रचाराची, असाही प्रश्न अनेकांना पडला.  प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. 18 रोजी नगरमध्ये पार पडली. कोरमअभावी सभा अर्धातास उशीरा सुरू झाली.

अध्यक्षस्थानी सभापती किसनराव खेमनर होते. व्यासपीठावर उपसभापती सुयोग पवार, संचालक अविनाश निंभोरे, गंगाराम गोडे, सलिमखान पठाण, बाबासाहेब खरात, राजू रहाणे, उषा बनकर, शरद सुद्रीक, अर्जुन शिरसाठ, संतोष दुसुंगे, नानासाहेब बडाख, साहेबराव अनाप, बाळासाहेब मुखेकर, सिमा निकम, दिलीप औताडे, राजू मुंगसे, संतोष अकोलकर, अनिल भवार, मंजुषा नरवडे तसेच सीईओ दिलीप मुरदारे, अतिरीक्त सीईओ गणेश पाटील, लेखापाल संजय चौधरी उपस्थित होते.

शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळ सत्तेत आहे. आता निवडणुका लागल्याने सत्ताधारी गुरुमाऊली, रोहोकले गुरुजी प्रणित गुरूमाऊली, डॉ. संजय कळमकरांचे गुरूकूल आणि राजेंद्र शिंदे, एकनाथ व्यवहारे यांची चौथी आघाडी मैदानात उतरली आहे. शासन आदेशाने ही निवडणूक तूर्त थांबलेली आहे. दि. 19 रोजी खंडपीठात निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता असल्याने या सभेला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. अपेक्षेप्रमाणे या सभेत विरोधक आक्रमक दिसले.

अध्यक्ष खेमनर यांचे प्रास्ताविक तब्बल दीड तास चालल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. संजय कळमकर यांनी कार्यकर्त्यांसह व्यासपीठाकडे धाव घेत दोन तास झाले, प्रास्ताविक चालले आहे. शिक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असे आवाहन केले. सदिच्छाचे राजेंद्र शिंदे यांनीही माईकचा ताबा घेत प्रास्ताविक पुरे, आता ‘चेअरमन’ला खाली बसवा, अशी मागणी लावून धरली. त्याचवेळी काही शिक्षकांनीही व्यासपीठाभोवती गर्दी करत गोंधळ घातला. पो. कॉ. प्रमिला गायकवाड यांनी माईकव्दारे शिक्षकांना कायद्याची आठवण करून दिली. बापूसाहेब तांबे यांनी व्यासपीठावर जाऊन प्रास्ताविक थांबवत विरोधकांना शांततेेचे आवाहन केले. त्यानंतर सभागृह शांत झाले.

सदिच्छा, इब्टा, साजिरेने घोषणाबाजी करत सुरुवातीपासून सभेत दबदबा निर्माण केला. गुरुकुलचे डॉ. कळमकर यांच्यातील साहित्यिकही जागा झाला. त्यांनी अलंकारिक भाषेतून सत्ताधार्‍यांचा समाचार घेतला. अन्य सभासदांनीही आपले विचार मांडले. यात बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वात चांगला कारभार झाल्याचे काही सभासदांनी सांगितले, तर काहींनी चुकीच्या कारभारावर बोट ठेवले.
रोहोकले गुरुजी प्रणित मंडळाचे प्रविण ठुबे यांनीही गेल्या वर्षीच्या ऑनलाईन सभेवर झालेल्या खर्चाचा जाब विचारला. विकास डावखरे घड्याळ खरेदीचे पुरावे दाखवत असताना त्यांचा माईक हिसकावून घेतल्याने तणाव निर्माण झाला. ऐक्यचे शरद वांढेकर यांनी सत्ताधार्‍यांच्या कारभाराचे कौतुक केले. उमेदवारांच्या खिशाला पुन्हा झळ! अगोदरच निवडणूक लांबणीवर पडली आहे. अशावेळी या सभेला कार्यकर्त्यांची ‘व्यवस्था’ करण्यासाठी उमेदवारांना पुन्हा झळ सोसावी लागली. दरम्यान, मंडळाचे नेते बापुसाहेब तांबे यांच्यासह अध्यक्ष खेमनर, सलिमखान पठाण, साहेबराव अनाप यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांना अभ्यासपूर्ण आणि सडेतोड उत्तरे दिल्याने त्यांनी विरोधकांची हवा काढून घेतली. शेवटी सर्व विषय मंजूर करून सभेची सांगता झाली.

प्रत्येक सभासदाला  10 हजारांचा लाभांश!
अध्यक्ष खेमनर यांनी संस्थेच्या ठेवी 1275 कोटी आहेत. कर्जावरील व्याजदर, ठेवींचा व्याजदर, कर्ज मर्यादा, मिळालेला नफा आणि 10.10 टक्के लाभांश देण्याचेही नियोजन स्पष्ट केले. यातून प्रत्येक सभासदाला किमान 10 हजारांचा फायदा होणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. गोंधळ घालणार्‍या शिक्षकांचे कान उपटताना छान छान बोलून, गप्पा मारून ठेवी मिळत नाहीत, त्यासाठी पत आणि विश्वास महत्त्वाचा आहे, असा टोला लगावला. आपल्या संस्थेकडे वाढत असलेल्या ठेवी ही आमच्या उत्तम कारभाराची पावती असल्याचे खेमनर म्हणाले.

बँकेपुरते लढा, पण संघटन ठेवा : डॉ. कळमकर
डॉ. कळमकर यांनी सत्ताधार्‍यांना विविध मुद्यांवरून घेरले. प्रवासभत्ता घेणार नाही, अशी भूमिका घेऊनही सत्ताधार्‍यांनी भत्ता घेतलाच. कोरोना काळात आपण घरात असताना लाखोंचा भत्ता काढला, याचे उत्तर सभासदांना मिळाले पाहिजे. शताब्दी महोत्सवाच्या कोट्यवधींच्या खर्चाचा हिशेब द्या, घड्याळ खरेदीला किती पैसे लागले ते सांगा, असा जाब त्यांनी विचारला. तसेच यापुढे वार्षिक अहवालात फक्त संचालकांचे फोटो छापावेत, असा ठराव मांडला.दरम्यान, सर्वांनी बँकेपुरते भांडा, पण शिक्षकांच्या प्रश्नांसाठी एकत्र रहा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

अहवाल म्हणजे फोटोचा अल्बम : अडसूळ
बँकेचा वार्षिक अहवाल म्हणजे फोटोचा अल्बम आहे. सत्ताधार्‍यांनी शिक्षक बँक लुटली आहे. सावित्रीच्या लेकी पुरस्कारातील घोटाळा, शताब्दी घोटाळा, घड्याळ घोटाळा, असे आरोपही नवनाथ अडसूळ यांनी केले. सत्ताधार्‍यांच्या पार्टीचे ‘बापू’ हेडमास्तर असून, त्यांनी कारभारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

काय ते मंडळ, काय ते धोरण, ओकेमध्ये हाय!
सभागृहात सदिच्छा, इब्टा, साजीर अशी चौथी आघाडी गळ्यात गुलाबी पंचे घेऊन आली होती. राजेंद्र शिंदे यांनी रावसाहेब रोहोकले व चेअरमन खेमनर यांच्यावर प्रहार केला. एकाने टेंडर न करता कामे केली, तर दुसर्‍याने टेंडर काढूनही कामे केली नाही, असा आरोप केला. सभासद कल्याण निधी, नफा वाटणी तक्ता, मयत कर्ज निवारण निधी, ठेवी वर्ग करण्याची भूमिका, यावर बोट ठेवत प्रश्नांचा भडीमार केला. तसेच ‘काय त्या गुरुमाऊली मंडळाची निर्मिती, काय तो भत्ता, काय ते धोरण, काय ते निर्णय, सगळे ओक्के, असा डायलॉग मारताच हशा पिकला.

Back to top button