नगर : मनपाचे 40 लाख पाण्यात! शहरातील रस्ते पुन्हा उखडले | पुढारी

नगर : मनपाचे 40 लाख पाण्यात! शहरातील रस्ते पुन्हा उखडले

नगर; पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर सर्वत्र खड्डे बुजविण्यात आले. खडी टाकून खड्डे बुजविले, पण त्यावर कारपेटचा थर टाकणे बाकी होते. त्यातच गेल्या पाच दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने, बुजविलेल्या खड्ड्यांतील खडी वाहून गेली. परिणामी महापालिकेचा चाळीस लाखांचा खर्च पाण्यात गेल्या.

शहरातील पाच रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. त्या कामाची निविदा प्रक्रिया होऊनही संबंधित ठेकेदार काम करीत नाही. परिणामी रस्त्यातील चितळेरोड, नवीपेठ, दाळमंडई, एमजी रोड आदी रस्त्यांसह शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपाने त्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली होती.

माळीवाडा – वसंत टॉकीज – धरती चौक- हातमपुरा चौक- रामचंद्र खुंट, आडतेबाजार चौक-दाळमंडई – तेलीखुंट – एमजी रोड – भिंगारवाला चौक – बँक रोड – नवीपेठ – नेता सुभाष चौक – चितळे रोड – चौपाटी कारंजा – दिल्लीगेट, दिल्लीगेट – न्यू आर्टस् महाविद्यालय, जुना बाजार रस्ता ते जुनी महापालिका आदी रस्त्यांच्या त्यात समावेश होता.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने त्यासाठी सुमारे चाळीस लाख रुपये खर्चाचे बजेट तयार केले. निविदा प्रक्रिया करून ठेकेदाराने काम सुरू केले. गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्ग व शहरातील अन्य मार्गावरील खड्डे खडी टाकून बुजविण्यात आले. त्यावर डांबराचा शेवटचा थर टाकणे बाकी होते. त्यात पाऊस सुरू झाला.

गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने त्या रस्त्यावर डांबर टाकणे अवघड होऊन बसले. ठेकेदार पाऊस उघडण्याची वाट पाहत होता. तोपर्यंत पावसाने खडी टाकून भरलेले खड्डे पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहेत. परिणामी मनपाने खड्डे बुजविण्यासाठी खर्च केलेले 40 लाख रूपये पाण्यात गेले, अशी चर्चा नगरकरांमध्ये सुरू आहे.

मनपाचे वराती मागून घोडे!
शहरातील रस्ते व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम उन्हाळ्यामध्ये होणे अपेक्षित असते. पण, वारंवार नागरिकांनी मागणी करूनही कोणीही लक्ष दिले नाही. ऐनवेळी खड्डे बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत पावसाळा सुरू झाला. ऐन पावसाळ्यात खड्डे बुजविण्याचे काम होती घेतले जाते. परंतु, पाऊस खड्डे बुजवू देत नाही. त्यामुळे मनपाला वारंवार त्यावर खर्च करावा लागतो, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

पाऊस थांबल्यावर पुन्हा काम
खड्डे बुजविताना शास्त्रीयदृष्ट्या काम केले जाते. खड्डा पूर्णपणे उकरून घेणे, त्यात मोठी खडी भरणे, त्यावर कच टाकणे, त्यानंतर काही दिवस थांबून शेवटी डांबराचे कार्पेट टाकणे, अशा पद्धतीने काम केले जाते. आता शहरातील काही रस्त्यावरील खड्डे बुजवून त्यावर कार्पेट टाकले आहे. आता त्याच्या शेजारी खड्डे झाले आहेत. तर, काही रस्त्यांवर शेवटचे डांबराचे कार्पेट टाकण्याचे राहून गेले आहे. त्यामुळे खड्ड्यातील खडी उखडली आहे. मात्र, पाऊस थांबल्यानंतर ते संपूर्ण काम करण्यात येईल, असे माहिती मनपा सूत्रांनी दिली.

खड्ड्यांत डांबर दाखवा, बक्षीस मिळावा : भुतारे
महापालिकेने शहरात बुजविलेल्या खड्ड्यात कुठेही डांबर दिसत नाही. योग्य पद्धतीने खड्डे बुजविले नाहीत. त्यामुळे ‘खड्ड्यात डांबर दाखवा आणि बक्षीस मिळावा’, असे आवाहन मनसेचे नितीन भुतारे यांनी केले आहे. गणपती विसर्जन मार्गावर पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी भुतारे यांनी केली आहे.

Back to top button