शिंगव्यात आढळला जखमी बिबट्या | पुढारी

शिंगव्यात आढळला जखमी बिबट्या

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलराव कराळे यांच्या वस्तीजवळ दि. 9 रोजी दुपारी एक वर्षे वयाचा बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला. युवानेते राज कराळे यांनी तिसगाव वनविभागाच्या अधिकार्‍यांना बिबट्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने वनविभागाचे अधिकारी शिंगवे येथे आल्यानंतर त्यांनी या जखमी अवस्थेतील बिबट्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर तिसगाव पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याला जुन्नर येथे पुढील उपचारांसाठी नेण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी दिली.

कामतशिंगवे, जवखेडे, आडगाव या परिसरात बिबट्या दिसून आल्याची मोठी चर्चा होती. वनविभागाने या परिसरात पिंजरा देखील लावला होता. शुक्रवारी दुपारी जखमी अवस्थेत बिबट्या आढळल्याने शेतकर्‍यांचा अंदाज खरा ठरला. जखमी अवस्थेत बिबट्या आढळल्याची वार्ता पसरताच त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. युवानेते राज कराळे, शिवा भोसले, गोकुळ कराळे, घन:श्याम कराळे, वैभव लांडगे, सतीश भोसले, कानिफ कराळे, संतोष कराळे, अशोक कराळे, बबन कराळे, शुभम लांडगे, राम ब्राह्मणे या तरुणांमुळे बिबट्याला जीवदान मिळाले.

Back to top button