शेतकर्‍यांना लागली पावसाची आस; पिके सुकू लागली | पुढारी

शेतकर्‍यांना लागली पावसाची आस; पिके सुकू लागली

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने, जोमात असलेली खरीप पिके सुकू लागली आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने व अंतर्गत मशागतीने जमिनीतील ओल कमी झाल्याने, कपाशीची वाढ खुंटली आहे. त्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पिके माना टाकू लागली आहेत. शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. जूनपासून खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने तुरळक व हलक्या स्वरूपात हजेरी लावल्याने शेतकर्‍यांनी तूर, बाजरी, सोयाबीन, कपाशी, मका, मूग आदी पिकांची पेरणी केली. त्यातील सर्वाधिक कपाशीची लागवड व सोयाबीन पिकाची पेरणी झालेली आहे.

त्यानंतर अधूनमधून हलक्या स्वरूपातील पावसाच्या सरींमुळे पिके वाढली आहेत. त्यामुळे पावसाने उघडीप देताच शेतकर्‍यांनी आंतरमशागत, खुरपणी, फवारणी यावर मोठा खर्च केला आहे. परिसरात दमदार पाऊस नसला, तरी हलक्या सरींमुळे पिकांची वाढ झाली. मात्र, आंतरमशागतीत जमिनीतील ओल उडून पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून कडक ऊन पडू लागल्याने पिके सुकू लागली आहेत.

सध्या पिके जोमात आली असली, तरी मका, सोयाबीन ऐन फुलोर्‍यात असताना पावसाने दडी मारली आहे. परिणामी सोयाबीनची फूलगळ होत असून, मका करपत आहे, तर कपाशीची वाढ खुंटली आहे. तालुक्यात यंदा मक्याचे क्षेत्र वाढले असून, कापूस व सोयाबीनचा पेरादेखील वाढला आहे. त्यात सोयाबीन फुलात असताना पाऊस गायब झाला. याचा परिणाम उत्पन्नावर होणार असून, पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी आटापिटा करीत आहेत. बियाणे, खते, कीटकनाशक असा मोठा खर्च शेतकर्‍यांनी केला आहे.

मात्र, पिके अंतिम टप्प्यात असताना पाऊस नसल्याने हातातोंडाशी आलेला घास जातो की काय? अशी भीती शेतकर्‍यांमध्ये आहे.
पाणी उपलब्ध असणार्‍या शेतकर्‍यांनी पिकांना पाणी देण्यास सुरवात केली असली, तरी बहुतांश कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची वाढ खुंटली आहे. सतत विजेचा खेळखंडोबा होत होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पावसाची अत्यंत आवश्यकता असून पाऊस न आल्यास खरीप पिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. केलेला खर्च, येणारे उत्पन्न यांचा ताळमेळ देखील बिघडण्याची शक्यता आहे. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.

गंगथडीला मात्र पिके पाण्यात!
गंगथडी भागातील भालगाव, शिरसगाव, वरखेड, खामगाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, तसेच जायकवाडी धरणाच्या फुगवट्याने पिके पाण्यात जाऊन नुकसान झाले आहे. नेवासा तालुक्यात एका भागात भरपूर पाऊस, तर अन्य भागात पाणीवाढीला व पिकांना पाऊसच नसल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आता पिकांना पाटपाण्याची गरज !
सध्या पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. आठ दिवसांत पाऊस न झाल्यास कपाशीसह अन्य पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. उत्पादनात घट होणार आहे. पाटपाणी आले, तरच शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. मुळा धरणातून कालव्यामध्ये सोडलेले जादा (ओव्हरफ्लोचे) पाणी शेतकर्‍यांना मोफत मिळावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Back to top button