नगर : दत्त जन्मोत्सव, वीर अंगद, रंगपंचमीची आरास! | पुढारी

नगर : दत्त जन्मोत्सव, वीर अंगद, रंगपंचमीची आरास!

नगर, पुढारी वृत्तसेवा : आनंद, चैतन्य आणि उत्सव निर्माण करणारा गणेशोत्सव अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि देशभक्तीपर देखावे गणेशोत्सवाचे आकर्षण ठरतात. श्री दत्त जन्मोत्सव, श्रीराम दूत वीर अंगद व रंगपंमीचा उत्सव देखावा नगरकरांचे आकर्षण ठरणार आहे.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर पहिल्यांदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून गणेशोत्सवानिमित्त बाजारात खरेदीसाठी गर्दी आहे. नगरच्या गणेशोत्सवातील देखाव्यांची परंपरा अनेक दिवसांची आहे. सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, देशभक्ती असे स्वरूपाचे देखावे सादर करून भाविकांच्या मनोरंजनाबरोबर प्रबोधनाचेही काम गणेश मंडळांकडून केले जाते. यंदा माजी नगरसेवक किशोर डागवले यांच्या शिवरद प्रतिष्ठानकडून श्री दत्त जन्मोत्सवाचा देखावा साकारण्यात येणार आहे. तर, माळीवाडा तरुण मंडळाकडून रंगपंचमीचा देखावा साकारण्यात येत आहे. तोफखाना येथे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या सिद्धेश्वर तरुण मंडळाकडून श्रीराम दूत वीर अंगद हा देखावा आकर्षण ठरणार आहे.

कपिलेश्वर मित्र मंडळ, माजी नगरसेवक मनीष साठे यांचे महालक्ष्मी तरुण मंडळ, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांचे समझोता तरुण मंडळ, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे नीलकमल मित्र मंडळ, नगरसेवक अविनाश घुले नीलकमल मित्र मंडळ, नगरसेवक दत्ता कावरे यांचे संगम मित्र मंडळ, नवयुग मित्र मंडळ, गिरीश जाधव यांच्या दिल्लीगेट मित्र मंडळ यांच्यासह विविध मंडळांकडून विविध देखाव्यांसह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

शिववरद प्रतिष्ठानतर्फे यावर्षी श्री दत्ता जन्मोत्सवाचा देखावा साकारण्यात येणार आहे. त्यात 25 हालत्या मूर्ती असणार आहेत. 25 फूट श्रीगणेशची मूर्ती असणार आहे.

                               – किशोर डागवाले, माजी नगरसेवक, अध्यक्ष, शिववरद प्रतिष्ठान

सिद्धेश्वर तरुण मंडळ श्रीराम दूत वीर अंगद देखावा साकारत आहोत. त्याचबरोबर गणेशोत्सवात दोन दिवस आरोग्य शिबिर घेणार असून, विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

                                         – धनंजय जाधव, माजी नगरसेवक, सिद्धेश्वर तरुण मंडळ

Back to top button