नगर : वाळकीत लोकवर्गणीतून उभी राहणार शाळा | पुढारी

नगर : वाळकीत लोकवर्गणीतून उभी राहणार शाळा

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक गुणवत्तेबाबत आघाडीवर असलेल्या वाळकी येथील न्यू इंग्लिश स्कूल, कला विज्ञान महाविद्यालयाचा लोकवर्गणीतून कायापालट होत आहे. गावचे भूमिपुत्र रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाळासाहेब बोठे यांच्या पुढाकारातून जुन्या शाळा खोल्यांच्या जागेवर साडेचार कोटी खर्चाची चार मजली इमारत उभी राहत आहे.

विद्यालयाचा कायापालट व नावलौकिक वाढविण्यासाठी येथे शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत उच्च पदावर काम करत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी देगणी स्वरूपात मदतीचा हात पुढे केला आहे, तसेच ग्रामस्थांनीही आपल्याच मुलांना शहरात जाऊन शिक्षण घेण्यापेक्षा येथेच विविध प्रकारचे शिक्षण मिळावे, यासाठी सर्व सुविधांयुक्त सुसज्ज इमारत उभारण्यासाठी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. शिवाय येथेच अध्यापन करणार्‍या शिक्षक वर्गही आर्थिक मदतीसाठी पुढे सरसावला आहे. इमारत बांधकामाचे बजेट मोठे असल्याने रयत शिक्षण संस्थेकडून आर्थिक मदत मिळत आहे.

सुमारे साडेचार कोटींचे बजेट असलेल्या चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. या इमारतीत 24 वर्ग खोल्या, प्राचार्य कक्ष, अद्ययावत कार्यालय, सांस्कृतिक हॉल, सुविधायुक्त प्रयोगशाळा, लिफ्टचा समावेश आहे. बांधकामाची रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. प्राचार्य बाळासाहेब साळुंके यांनी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ शिक्षक सुनील कोठुळे, एकनाथ कासार, संतोष भालसिंग आदींसह शिक्षक उपस्थित होते.

शैक्षणिक कार्यास सर्वांचा हातभार

इमारत बांधकामासाठी शासकीय निधी मिळत नाही. रयत शिक्षण संस्थेकडून मिळत असलेली आर्थिक मदत अपुरी पडत असल्याने, विद्यालय इमारत बांधकासाठी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक सढळ हस्ते आर्थिक मदत करत आहेत. सर्वांच्या मदतीतून लवकरच सुविधांयुक्त सुसज्ज इमारत उभी राहणार आहे, असे प्राचार्य बाळासाहेब साळुंके यांनी सांगितले.

Back to top button