अरणगावला मिळणार ‘मुळा’चे पाणी ! | पुढारी

अरणगावला मिळणार ‘मुळा’चे पाणी !

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर एमआयडीसी ते अरणगाव पाणी योजनेसाठी जल जीवन मिशन अंतर्गत 15 कोटी 59 लाख 450 रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 4 कोटी 82 लाख रूपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अरणगावला मुळा धरणातून पाणी मिळणार असून, वाड्या वस्त्यांनाही पाणी दिले जाणार आहे. या योजनेमुळे अरणगावकरांचा पाण्याचा वनवास आता संपणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी दिली. अरणगाव ग्रामपंचायतने सुपा एमआयडीसीमधून अरणगावला मुख्यमंत्री पेय जलमधून पाणी मिळण्यासाठी 12 जानेवारी 2014 रोजी प्रस्ताव दिला होता.

परंतु, सदर प्रस्ताव पाण्याची उपलब्धता व तांत्रिक अडचणीमुळे होऊ मंजूर शकला नाही. त्यानंतर नगर एमआयडीसी येथून पाणी मिळण्यासाठी 16 फेब्रुवारी 2020 रोजी प्रस्ताव पाठविला होता. संबंधित कार्यालयाने तो प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठविला. एमआयडीसीने अरणगावकरांना दररोज 9 लाख 45 हजार लिटर पाणी मंजूर केले आहे. प्रस्तावित पाणी योजना आराखड्यामध्ये एमआयडीसी ते नाट वस्तीपर्यंत 200 एमएम व्यासाची (8 इंच) 20 किलोमीटर जलवाहिनी टाकणे व तेथे 80 हजार लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी उभारण्यात येईल.

दळवी मळा, हराळ मळा, नाट वस्ती, मारुती नगर, अवतार मेहेर बाबा परिसर, एमपीआर, श्रीकृष्ण मंदिर, पुंडमाळा, आजबे वस्ती या परिसराला पाणीपुरवठा केला जाईल. दौंड रोडवरील आग्नेय शाळेजवळ 1.20 लाख लिटर पाण्याची टाकी उभारण्यात येईल. या टाकीतून चोपनवाडी, शेळके नळा, शिंदेवाडी पूर्ण, मतकर वस्ती, आमले वस्ती, दमढेरे वस्ती, कोके मळा, गहिले मळा, मोरे मळा, मुदळ वस्ती या परिसराला पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्या नंदा बबन करांडे यांनी सांगितले.

यावेळी जिजाबाई ज्ञानदेव शेळके, किसनराव लोटके, उपसरपंच संपत कांबळे, ग्रामसेवक पोपट रासकर, पोपटराव पुंड, आनंदराव शेळके, गंगाधर शिंदे, बाळु शिंदे, रमेश जंगले, माजी उपसरपंच महेश पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. पाणी योजना मंजूर झाल्याने अरणगावकरांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

योजना मंजुरीसाठी यांची मदत
योजना मंजुरीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खा.डॉ. सुजय विखे, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार नीलेश लंके, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांचे सहकार्य मिळाले. खा.विखे यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन यांच्या समवेत एनओसी घेताना बैठक घेत परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न केले.

Back to top button