नगर : मुलींना त्रास देणारे तिघे जेरबंद | पुढारी

नगर : मुलींना त्रास देणारे तिघे जेरबंद

राशीन, पुढारी वृत्तसेवा : बाहेरच्या जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून, तिला त्रास देणार्‍या तीन टवाळखोरांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. मुलीचा पाठलाग करत जाऊ नका, असे समजावून सांगितल्याचा राग आल्याने या टवाळखोरांनी मुलीसह तिच्या पित्यावर हल्ला केला होता.

बाहेरच्या जिल्ह्यातून कामानिमित्त कर्जत तालुक्यात येऊन तालुक्यातील विद्यालयीत शिकणारी अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेत जात असताना, पाठलाग करून अमोल दादा दानवले (रा.दानवले वस्ती, राशीन) हा तिला त्रास देत होता. याबाबत तिने आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली होती. मात्र, बदनामी होऊ नये यासाठी कुटुंबाने पोलिसात तक्रार दिली नव्हती. वेळोवेळी अमोल दादा दानवले व त्याचे मित्र गणेश हौसराव सुरवसे, मुरलीधर सायकर, केतन गायकवाड सर्व (रा.राशीन) हे सर्व तिचा पाठलाग करत होते.

गर्दीचा फायदा घेत अमोल दानवले याने मुलीचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तेव्हा मुलीने आरडाओरड केली. त्यानंतर तिच्या वडिलांनी त्यांना माझ्या मुलीचा पाठलाग करत जाऊ नका, असे सांगितले. त्यानंतर वाद झाल्याने गणेश सुरवसे याने हातातील चाकूने तिच्या वडिलांच्या पोटात मारून दुखापत केली. वडिलांना सोडविण्यासाठी मुलगी आली असता, गणेश सुरवसे याने तिच्या उजव्या हाताच्या दंडावर चाकू मारून तिलाही किरकोळ दुखापत केली. त्यानंतर आरडाओरड केल्याने सर्वांनी तेथून पळ काढला.

या प्रकरणी मुलीने पित्यासह कर्जत पोलीस ठाण्यात निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची भेट घेतली. त्यांनी काळजी करू नका, पक्की कारवाई होईल, असा विश्वास देऊन तक्रार देण्यास सांगितले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अमोल दादा दानवले, मुरलीधर विश्वनाथ सायकर, केतन बाळू गायकवाड (तिघे रा.राशीन) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

कुणी त्रास देत असल्यास निःसंकोचपणे पोलिसांना कळवा. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तक्रारदार महिला-मुलींचे नाव गुप्त ठेवण्यात येत असल्याने कुणीही भीती बाळगू नये. महिला व मुलींना त्रास देणार्‍यांची गय केली जाणार नाही.

                                                             – चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत

Back to top button