अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा पेटला ! कुकाणा येथे इनामी जामिनीच्या वारसांनी बांधकाम पाडले बंद | पुढारी

अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा पेटला ! कुकाणा येथे इनामी जामिनीच्या वारसांनी बांधकाम पाडले बंद

कुकाणा : पुढारी वृत्तसेवा : कुकाणा येथे शहावली बाबा पीराच्या इनामी जमिनीमध्ये अतिक्रमण करून पक्के बांधकाम सुरू असल्याचा दावा करत, सदर बांधकाम बंद पाडून इनामी जागेमध्ये बांधकाम करण्यात येऊ नये, यासाठी वारसांकडून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे.

कुकाणा येथे मोठी बाजारपेठ असल्याने जवळपासच्या 30 ते 40 खेड्यापाड्यांचा संपर्क या शहराशी येतो. अनेक मोठे व्यापारी या ठिकाणी आपला व्यवसाय करण्यासाठी येतात. त्यामुळे येथील जागेचे दर गगनाला भिडले आहेत. याच कारणामुळे येथे जागेवरून अनेकदा वाद झाले आहेत. काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशान्वये एसटी बसस्थानकासाठी राखीव ठेवलेल्या जागेवरील अतिक्रमण पाडण्यात आले होते. आता पुन्हा नव्याने या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

न्यायामत शहावली पीर बाबाची गट नंबर 88 व 89 इनामी जमीन आहे. सदर इनामी जमिनीबाबत नेवासा न्यायालयात, तसेच औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाकडे वाद सुरू आहे. असे असतानाही सदर वादग्रस्त जागेवर अतिक्रमण करून आरसीसी बांधकाम सुरू असल्याचा दावा करत, कुकाणा येथील इनामी जमीन वारस मुसा इनामदार, शाकीर इनामदार, सलीम शाहा, मतीन इनामदार व शकील इनामदार आदींनी जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर जागेवरील बांधकाम तात्काळ थांबविण्याची मागणी तक्रारी अर्जाद्वारे केली आहे.

बांधकाम बेकायदा बंद पाडले
ग्रामपंचायतीकडून 11 महिन्यांच्या कराराने जागा घेऊन आम्ही 40 ते 50 वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करत आहोत. आमची दोन-तीन मजली आरसीसी बांधकामे गेल्या अनेक वषांपासून आहेत. आम्ही ग्रामपंचायतीला दर वर्षी जागा भाडेही भरतो. आमच्याकडे तशा पावत्या आहेत. बांधकामाचा काही भाग नादुरुस्त झाल्याने, तो पाडून नव्याने बांधकाम करत असताना काही लोकांनी येऊन आमची बांधकामे बेकायदेशीर रित्या बंद पडली आहेत, असे जागाधारक निवृत्ती कोलते, आबासाहेब रिंधे यांनी सांगितले.

गट नंबर 89 हा ग्रामपंचायत मालकीचा असून, ही जागा ही गाव विस्तारासाठी सरकारी दवाखाना, गोडाऊन यासाठी ग्रामपंचायतीने खरेदी खताद्वारे विकत घेतलेली आहे. तशी गावच्या रेकॉर्डला नोंद असून, ग्रामपंचायतीच्या नावाने उतारा देखील उपलब्ध आहे. त्या जागेवर काही दिवसांपूर्वी शासकीय घरकुल बांधण्यासाठीही जागा दिली आहे.
                            -दादासाहेब आरगडे, ग्रामविकास अधिकारी, कुकाणा

Back to top button