सामाजिक ‘न्याय’ भवन प्रतीक्षेतच ! इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडणार का? | पुढारी

सामाजिक ‘न्याय’ भवन प्रतीक्षेतच ! इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडणार का?

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी आणि कांँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्यांच्या हस्ते ‘सामाजिक न्याय’ भवनाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी धरलेला आग्रह, त्यात रस्त्याचाही प्रलंबित प्रश्न, यावर तोडगा काढता काढता राज्यात सत्तांतर झाले, तरीही या न्याय भवनाचे उद्घाटन मात्र होऊ शकले नाही. आता राज्यात सरकार बदलले आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या कालावधीत तरी या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडणार का? याविषयी लक्ष लागले आहे.

सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीमुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वीच या इमारतीचे सर्व काम पूर्ण झाले आहे. रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असला, तरी त्याची सोडवणूक होऊन कर्मचारी देखील नव्या दालनात जाण्यासाठी उत्सूक आहेत. परंतु, इमारतीच्या उद्घाटनाला राजकीय झालर लागल्याने दिवसेंदिवस हा मुहूर्त लांबणीवर पडत होता. जिल्हाधिकारी कार्यालयाचे तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झाले होते.

थोरातांच्याच हस्ते 26 जानेवारी 2022 ला या इमारतीच्या उद्घाटनाचे नियोजन होते. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे उद्घाटन व्हावे, अशी इच्छा होती. त्यामुळेच तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी तांत्रिक अडचण दाखवून ‘तो’ कार्यक्रम पुढे ढकलला. अर्थात थोरात यांच्या हस्ते नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी गैरहजर दिसले होते. त्यामुळे किमान सामाजिक न्याय भवनाचे उद्घाटन आपल्या नेत्यांच्या हस्ते व्हावे, अशीच त्यांची इच्छा होती, हे लपून राहिले नव्हते.

संकल्पना आघाडीची, निधी मात्र भाजपचा !
राज्यात 2005 मध्ये आघाडी सरकारच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन पुढे आले. यातून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नवीन इमारती उभ्या राहिल्या होत्या. शासकीय कामे एकाच छताखाली मार्गी लागावीत, यासाठी नगरलाही सामाजिक न्यायभवन मंजूर झाले होते. पण, यासाठी जागा मिळत नसल्याने भाडोत्री इमारतीत कामकाज सुरू होते. पुढे सावेडी बसस्थानकाजवळील जागा उपलब्ध झाली. परंतु तिचे हस्तांतरण अनेक वर्षे रखडले होते. ते हस्तांतरण झाल्यानंतर निधीची समस्या पुढे आली. मागील भाजप सरकारच्या काळात या इमारतीसाठी निधी मंजूर झाला होता. 30 एप्रिल 2017 रोजी या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. अनेक अडचणी आल्याने प्रत्यक्षात एप्रिल 2018 मध्ये कामाला सुरुवात झाली. त्यानंतर पुन्हा कोरोनाचा अडथळा आला. त्यामुळे मंजुरीवेळी 4 कोटींचा असलेला हा आराखडा 17 कोटींवर पोहोचला. साधारणतः सात-आठ महिन्यांपूर्वी हे काम पूर्ण झाले आहे.

एकाच छताखाली सहा महामंडळांची कार्यालये
नूतन इमारतीमध्ये जिल्हा समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालय, जादूटोणाविरोधी कायदा अंमजलबजावणी कार्यालय, संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, महात्मा फुले महामंडळ अशी सहा महामंडळांची कार्यालये असणार आहेत, तसेच सांस्कृतिक सभागृह असणार आहे.
‘समाजकल्याण’ चा वनवास संपणार
2014 पासून समाजकल्याण विभागाचे कर्मचारी एका भाडोत्री इमारतीत कामकाज करत आहेत. बोल्हेगाव शिवारातील एका इमारतीत ‘समाजकल्याण’चा श्वास गुदमरला आहे. येथेही भाड्यापोटी महिन्याला 21 हजार रुपयांचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडत असून, भाडेवाढीनंतर महिन्याला 57 हजारांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे नव्या इमारतीत लवकरात लवकर स्थलांतर हाच योग्य पर्याय असणार आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन?
जिल्ह्याचे नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटनासाठी लक्ष घालावे, असा सामाजिक संघटनांचा सूर आहे. त्यामुळे निश्चितच मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकारातून, सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होऊ शकते, अशीही चर्चा आहे. महिनाभरात याबाबत निर्णयाची शक्यता सूत्रांकडून समजली आहे.

Back to top button