राहुरी : ‘मुळा’चे दरवाजे उघडले; तांत्रिकदृष्ट्या धरण पूर्ण क्षमतेने भरले | पुढारी

राहुरी : ‘मुळा’चे दरवाजे उघडले; तांत्रिकदृष्ट्या धरण पूर्ण क्षमतेने भरले

राहुरी; पुढारी वृत्तसेवा: संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेले मुळा धरण अखेर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला तांत्रिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडण्यात आल्याने देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या उपस्थितीत दरवाजे उघडण्यात आले. नगर दक्षिणेची तृष्णा भागविणारे मुळा धरण साठ्याने 23 हजार 800 दलघफूची पाणी साठा ओलांडताच मुळा पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या.

मुळाचे पाणलोट क्षेत्र असलेले कोतूळ, पांजरे, हरिश्चंद्रगड पट्ट्यामध्ये श्रावण सरींचा जोर ओसरल्याने पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाचे खलबते सुरू होते. दरम्यान, शनिवारी पुन्हा श्रावण सरींचा वर्षाव सुरू झाल्याने धरणाकडे होणारी पाण्याची आवक वाढली. सुमारे 9 हजार क्यूसेकने पाणी आवक होत असल्याने मुळा पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. मुळा धरणाचे कार्यकारी अभियंता पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे रविवारी सायंकाळी 5 वाजता धरणाचे दरवाजे उघडले जाणार असल्याचे घोषित केले.

त्यानुसार पाटबंधारे विभागाने धरणस्थळी सायरन देत नदी पात्रातील साधने, विद्यूत पंप काढून घेण्याचे आवाहन केले. नदी पात्रालगत असलेली राहुरी नगरपरिषद व ग्रामपंचायत प्रशासनानेही सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. काल (14 ऑगस्ट) रोजी सायंकाळी 5 वाजता धरण साठा 24 हजार 390 दलघफू झालेला असताना सर्व 11 दरवाजे उघडण्यात आले. दरवाजे 0.54 इंच उचलण्यात आले. प्रत्येकी दरवाज्यातून 196 क्यूसेक प्रवाहाने मुळा नदी पात्रात पाणी झेपावत आहे.

याप्रसंगी उपअभियंता शरद कांबळे, सहाय्यक स्थापत्य सलीम शेख, सुनील हरिश्चंद्रे, आयुब शेख, दिलीप कुलकर्णी, अण्णा आघाव, बी. जे. नागले, एस.पी. देवकर उपस्थित होते. मुळा धरणाकडे सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान 5 हजार 990 क्यूसेक प्रवाहाने नवीन पाणी जमा होत होते तर धरणाच्या दरवाजातून 2 हजार क्यूसेकने सोडलेल्या पाण्याचा प्रवाह नदी पात्रातून गतीने वाहत आहे.

मुळा धरण तिरंग्याने न्हाऊन निघाले
मुळा धरणातून सायंकाळी पाणी सोडल्यानंतर दरवाजावर लाईटची आकर्षक रोषणाई तिरंग्याची छटा पर्यटकांना भुरळ पाडत आहे. अमृतमहोत्सवानिमित्त संपूर्ण देश तिरंगामय झाल्यानंतर मुळा धरणाच्या दरवाजातून बाहेर पडणार्‍या पाण्यातील तिरंगा रंगाची छटा नेत्रदिपक ठरत आहे. धरणातून पाणी सोडल्यानंतर शेकडो पर्यटकांची गर्दी धरणस्थळी दिसली.

 

Back to top button