संगमनेर तालुक्यात प्रवरामाई दुथडी… | पुढारी

संगमनेर तालुक्यात प्रवरामाई दुथडी...

संगमनेर: पुढारी वृत्तसेवा : अकोले-संगमनेर तालुक्यात झालेला संततधार पाऊस व भंडारदरा आणि निळवंडे धरणातून प्रवरापात्रात सोडलेल्या विसर्गामुळे संगमनेर तालुक्यात प्रवरा नदी  दुथडी भरून वाहू लागली आहे. दरम्यान, ओझर बंधार्‍याच्या भिंतीवरून 11,375 क्युसेसने बंधार्‍याच्या पूर्वेकडील प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपाररी 1 वाजेच्या आकडेवारीनुसार भंडारदरातून 8,100 तर निळवंडे धरणातून 10,567 क्युसेस प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू झाला. संगमनेर तालुक्यातील ओझर बंधार्‍या नजीकची प्रवरा नदी दुधडी भरून वाहू लागली आहे. ओझर बंधार्‍याच्या भिंतीवरून बंधार्‍याच्या पूर्वेकडील प्रवरा नदी पात्रात 11,375 क्युसेस विसर्ग सुरू होता. बंधार्‍याच्या डाव्या कालव्यामधून 104 क्युसेस पाणी सुरू होते, मात्र ओझर बंधार्‍याचा उजवा कालवा अद्याप बंद आहे.

उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने चिंता..!
वाढलेल्या पाण्यामुळे ओझर बंधार्‍याच्या पश्चिमेला रहिमपूर, कनोली, कनकापूर परिसरातील काही शेतातील पिकांमध्ये पाणी शिरल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याची चिंता या परिसरातील शेतकर्‍यांना लागली आहे.

Back to top button