नगर : श्रावणात भरला पिंपळगाव माळवी तलाव | पुढारी

नगर : श्रावणात भरला पिंपळगाव माळवी तलाव

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेला पिंपळगाव माळवी तलाव गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच श्रावण महिन्यात तुडूंब भरला आहे. त्यामुळे परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या तुडूंब भरलेल्या तलावाचे जलपूजन गुरुवारी (दि. 11) सकाळी माजी मंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तलाव व सातशे एकराचा परिसर नगर महापालिकेच्या मालकीचा आहे. सन 1920 मध्ये नगर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हा तलाव बांधण्यात आला होता. तलावाच्या उभारणीस या वर्षी 102 वर्षे पूर्ण झाले आहेत. सुमारे 60 ते 70 वर्षे या तलावातून नगर शहराला पाणीपुरवठा होत होता. नंतर मुळा धरणावरून पाणी योजना झाल्यानंतर या तलावातून नगर शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झाला; मात्र आजही या तलावातून परिसरातील पिंपळगाव माळवी, डोंगरगण, मांजरसुंभा, जेऊर परिसरातील गावांना पाणीपुरवठा होत आहे.

दोन वर्षापूर्वी तब्बल 10 वर्षांनंतर हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरत आहे. यावर्षी तर अनेक वर्षांनंतर श्रावण महिन्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. या तुडूंब भरलेल्या तलावाचे गुरुवारी (दि. 11) माजी मंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी सभापती रघुनाथ झिने, डॉ. राम कदम, पोखर्डीचे सरपंच रामेश्वर निमसे, डोंगरगणचे उपसरपंच संतोष पटारे, सागर गुंड, इंद्रभान बारगळ, बाबासाहेब झिने, दत्तात्रय भोंदे, राष्ट्रवादी भटक्या विमुक्त आघाडीचे तालुका अध्यक्ष दत्ता डोकडे आदी उपस्थित होते.

Back to top button