नगर : भारत देश सर्व क्षेत्रांत जगावर राज्य करेल | पुढारी

नगर : भारत देश सर्व क्षेत्रांत जगावर राज्य करेल

लोणी, पुढारी वृत्तसेवा : भारतीय संस्कृतीचा मूलभूत सिध्दांतच त्यागाशी जोडला गेला आहे. ही संस्कृती सगळ्यांमध्ये एकता निर्माण करणारी आहे. येथील साहित्य व कलासुध्दा मानवाला एकत्र ठेवून मजबूत करण्याचे काम करीत असल्याने भविष्यात भारत देश बौद्धिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक व आर्थिक क्षेत्रात जगावर राज्य करेल, असा आशावाद केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केला.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा. यांच्या 122 व्या जयंतीचे औचित्य साधून परंपरेप्रमाणे राज्यस्तरीय साहित्य व कलागौरव पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते झाले. 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास बुलढाणा अर्बन बँक अध्यक्ष राजेश्याम चांडक, पुरस्कार निवड समिती अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा., प्रवरा अभिमत विद्यापीठ कुलपती डॉ. राजेंद्र विखे पा., खा. डॉ. सुजय विखे पा., माजी आ. चंद्रशेखर कदम, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा. यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केले. लोकनेते खा. डॉ. बाळासाहेब विखे पा. यांच्या स्मृतिस्थळास पुष्पाजंली अर्पण केली.

छत्रपती शिवरायांकडून स्वराज्याची कल्पना

राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले, समाजातील साहित्यिक व कलाकारांचा होणारा सन्मान हे समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे. शेतकर्‍यांशी जोडलेल्या संघटनांतून हा सत्कार होत असल्याने याचे महत्त्व अधिक असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन, ते म्हणाले, महाराष्ट्राच्या भूमिला संत ज्ञानेश्वर, संत तुकारांमांचा जसा आध्यात्मिक वारसा मिळाला तसाच छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्वराज्याची कल्पना मिळाली. या संकल्पनेतूनच स्वातंत्र्याच्या आंदोलनाची प्रेरणा मिळाल्याचे स्पष्ट करुन, राज्यपाल मोहम्मद म्हणाले, मी कोण आहे किंवा मी कुठून येतो, यापेक्षाही भारतीय संस्कृतीचे मूळ शोधले पाहिजे. ती खरी आपली चेतना आहे. घरामध्ये जशी आपण किमती वस्तू जपून ठेवतो, तशी ही संस्कृती मूल्य आणि आदर्शांच्या आधारावर आपल्याला जपावी लागणार आहे. हे आदर्शच उद्या चरितार्थाचा भाग बनणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अ. भा. साहित्य संमेलन अध्यक्ष भारत सासणे म्हणाले, समाजाला भाषा किंवा अक्षर ज्ञान अवगत झाले असले तरी, समाज एका निरक्षरतेकडे जात आहे का, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कला कधी विभक्त होत नाही, तिचे कधी विभाजन करता येत नाही. कला व साहित्यामध्ये विस्तृत असे समाज जीवन समाविष्ट असल्याने राजकारण व समाजकारणात तिची व्यापकता आपल्याला पहायला मिळते, असे ते म्हणाले.

जीवन गौरव पुरस्कार प्राप्त किशोर बेडकीहाळ म्हणाले, या पुरस्कारापर्यंत पोहचण्यासाठी अनेकांच्या हाताची मदत झाली. हा पुरस्कार त्यांनी दिवंगत पत्नी व डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना समर्पित केल्याचे सांगत, पद्मश्रींच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार मोठा आहे, असे ते म्हणाले. खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी स्वागत व प्रास्ताविकात साहित्य पुरस्कारांची 32 वर्षांची परंपरा प्रवरा परिवाराने जोपासल्याचे स्पष्ट केले. साहित्यिक व कलाकारांचा या पुरस्काराने सन्मान करण्याची मिळणारी संधी हा आमचा गौरव असल्याचे ते म्हणाले.

पुरस्काराचे यंदाचे 32 वे वर्ष..!

यंदा साहित्य जीवन गौरव पुरस्काराने किशोर बेडकीहाळ, रवींद्र इंगळे-चावरेकर, अभय गुलाबचंद कांता, मंगेश नारायण काळे, के. जी. भालेराव, हिरालाल पगडाल यांना साहित्य पुरस्कार, तर दत्ता भगत व छबुबाई चव्हाण यांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेल्या पुरस्काराचे हे 32 वे वर्ष आहे.

केवळ फॉलोअर्स असून चालणार नाही..!

सद्य परिस्थितीत विचारांची गर्दी वाढली असली, तरी केवळ फॉलोअर्स असून चालणार नाही, तर विचावंतांची आवश्यकता असल्याचे अ. भा. साहित्य संमेलन अध्यक्ष भारत सासणे यांनी आवर्जून सांगितले.

Back to top button