नगर अर्बन बँकेच्या खातेदारांना भारतीय रिझर्व्ह बँकेचा दिलासा, एनईएफटी, आरटीजीएस पैसे मिळणार | पुढारी

नगर अर्बन बँकेच्या खातेदारांना भारतीय रिझर्व्ह बँकेचा दिलासा, एनईएफटी, आरटीजीएस पैसे मिळणार

नगर : पुढारी वृत्तसेवा वेगवेगळ्या कारणांमुळे एनईएफटी, आरटीजीएसद्वारे नगर अर्बन बँकेत अडकलेले खातेदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित खातेदारांचे पैसे परत करण्यासाठी अर्बन बँकेने केलेली विनंती मान्य करत रिझर्व्ह बँकेने तसे पत्रही अर्बन बँकेला दिले आहे. नगर अर्बन कॉपरेटिव्ह मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेवर दि. 6 डिसेंबर 2021 रोजी भारतीय रिझव्हर्र् बँकेकडून निर्बंध लावण्यात आलेले असून, कोणत्याही खातेदाराकडून कुठल्याही ठेवी स्वीकारण्यावर बंधने घालण्यात आलेली होती.

असे असताना देखील काही खातेदारांच्या सेव्हिंग्ज व चालू खात्यांवर अनावधानाने व संबंधित खातेधारकांकडून त्यांच्या व्यवसायाशी निगडित घेणेदारांना यापूर्वीच खाते क्रमांक व बँकेचे आयएफसी कोड, आरटीजीएस डिटेल्स दिलेले असल्याने देणेदारांनी खातेदारांच्या खात्यावर पैसे जमा केल्याने खातेदारांची रक्कम बँकेत अडकलेली होती. बँकेत आरटीजीएस एनईएफटी संपूर्णरित्या बंद करता येत नाही. कारण ज्या खातेदारांना बँकेने कर्ज अदा केले आहे.

अशा खातेदारांचे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम, तसेच आरटीजीएस, एनईएफटीद्वारे वसुली करणे कामी हा गेट-वे खुला ठेवण्यात आलेला असल्याने कर्ज खात्यांव्यतिरिक्त इतर खात्यांवर देखील रकमा जमा झाल्या आहेत. काही खातेदारांनी खाते बंद केले असूनही त्यांना देणे लागत असणार्‍या देणेदारांनी त्यांच्या अर्बन बँकेच्या खात्यांवर आरटीजीएस व एनईएफटीद्वारे रक्कम जमा केली होती. हे पैसे परत मिळण्यासाठी खातेदार बँकेकडे पाठपुरावा करीत होते.

परंतु, बँकेवर आलेल्या निर्बंधानंतर हे पैसे परत करण्याचा मार्ग खडतर झाला होता. या कामी रिझर्व्ह बँकेशी प्रभारी चेअरमन दिप्ती गांधी यांच्या पुढाकारातून संचालक ईश्वर बोरा, गिरीश लाहोटी व संपूर्ण संचालक मंडळाने पाठपुरावा केला. त्यास रिझर्व्ह बँकेने प्रतिसाद देत दि. 6 डिसेंबर 2021 नंतर जमा झालेले पैसे परत करण्याची अर्बन बँकेची विनंती मान्य केली आहे. येत्या सोमवारपासून (दि. 8) हे पैसे संबंधितांना मिळणार आहेत.

Back to top button