नगर : कामात हलगर्जीपणा; गृहपाल निलंबित | पुढारी

नगर : कामात हलगर्जीपणा; गृहपाल निलंबित

नगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे गृहपाल महेंद्र मैड यांच्यावर प्रशासकीय कामकाजातील दिरंगाईप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान,कामकाजात हलगर्जीपणा करणारे अन्य काही अधिकारी, कर्मचारीही सहायक आयुक्तांच्या रडारवर असून, संबंधितांचे प्रस्ताव थेट आयुक्तांकडे पाठविण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

समाजकल्याणचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी वसतिगृहातील मुलांच्या सोयीसुविधा, स्वच्छता, दप्तर नोंदींबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत. तरीही काही ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले. यात गृहपाल महेंद्र मैड हे शासकीय वसतिगृहात रहात नसल्याचे आढळले होते. वसतिगृहातील अभिलेखेही अर्धवट स्थितीत होते. मुलांच्या खोल्यांमध्ये आवश्यक सुविधांचा अभाव होता. लेखाविषयक विविध नोंदवह्या परिपूर्ण नसल्याची बाब निदर्शनास आली होती.

रोजकीर्द नोंदवही नुसार कोषागार कार्यालयातून आहरित करण्यात आलेल्या विविध बाबींच्या रकमा संबंधितांस वितरित न करणे, वर्ग 4 संवर्गातील कर्मचार्‍यांचे अभिलेखे अपूर्ण, भोजन कक्षात अस्वच्छता, विद्यार्थ्यांना नियमानुसार देय असलेल्या सुविधा न पुरविणे, तसेच वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याची टाकी मागील 5 महिन्यांपासून स्वच्छ नसणे, यासारख्या प्रशासकीय अनियमितता आढळून आल्या आहेत.

दरम्यान, या सर्व गंभीर बाबी विचारात घेता शिस्तभंग प्राधिकारी तथा आयुक्त डॉ. प्रशांत नारनवर यांनी महेंद्र मैड यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश बजावले आहेत. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय हे आयुक्त, समाज कल्याण पुणे येथे राहील, असेही आदेशात म्हटले आहे.

समाजकल्याण आयुक्तांच्या सूचनांनुसार सर्व वसतिगृहात कामकाज करणे बंधनकारक आहे. याबाबत कोणाचाही हलगर्जीपणा मी खपवून घेणार नाही. प्रशासकीय कामात जर कोणी अशाप्रकारे दिरंगाई करत असेल, तर संबंधितावर कारवाईसाठी तसा प्रस्ताव सादर केला जाईल.

                                             – राधाकिसन देवढे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण

Back to top button