नगर : एमआयडीसीत आठ फूट अजगर | पुढारी

नगर : एमआयडीसीत आठ फूट अजगर

नगर, पुढारी वृत्तसेवा : नगर-मनमाड रस्त्यावर एमआयडीसीसमोर रस्त्यालगत असलेल्या ओबेरॉय फार्ममध्ये आढळलेल्या सात ते आठ फूट लांबीच्या अजगराला पकडून वन विभागाच्या मदतीने निसर्गात मुक्त करण्यात आले.

ओबेरॉय फार्ममध्ये रविवारी (दि.31) सकाळी उसाच्या शेतात काम करणार्‍या मजुरांना मोठा साप असल्याचे आढळून आले. त्यांनी हितेश ओबेरॉय यांना याबाबत माहिती दिली. ओबेरॉय यांनी निसर्गमित्र व सर्प अभ्यासक मंदार साबळे यांना कळविले. साबळे यांनी तात्काळ त्या ठिकाणी युसूफ खान यांना पाठविले. त्या ठिकाणी उसात जवळपास सात ते आठ फूट लांबीचा अजगर होता. शेख यांनी त्यास पकडून साबळे यांच्याकडे दिले.

साबळे यांनी याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांना दिली. सहायक वनसंरक्षक जयराम गोंदके व राठोड यांच्या मार्गदर्शनानुसार या अजगरास जवळच्या राखीव वनक्षेत्रात लगेच मुक्त करण्यात आले. यावेळी साबळे, वनपाल अशोक शर्माळे, राहुल खंडागळे, सचिन धनगर, चालक सचिन ठोंबरे आदी वनकर्मचारी उपस्थित होते.

विळद व देहरे भागात अजगराचे वास्तव्य अनेक वर्षांपासून आहे. एमआयडीसी भागातही दोन तीन वेळेस अजगर आढळून आले आहेत. एमआयडीसीच्या समोरील भागात मात्र पहिल्यांदाच अजगर आढळून आला असल्याचे साबळे यांनी सांगितले. हा अजगर या भागात रस्त्याच्या कडेला कोणीतरी रात्रीच्या वेळी आणून सोडला असण्याची शक्यता साबळे यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय अजगराची जास्तीत जास्त लांबी पंधरा फुटांपर्यंत वाढते. त्याच्या खाद्यात रानडुकराची पिले, रानससे, उंदीर, घुशी व इतर छोटे सस्तन प्राणी, कोंबडीच्या आकाराचे छोटे पक्षी यांचा समावेश असतो. तर पूर्ण वाढ झालेला अजगर हरणाची, शेळीची छोटी पिले, रानडुकरे यांचा सहज फडशा पाडतो, असे साबळे यांनी सांगितले.

Back to top button