भिंगारमध्येही शिवसेनेला पडले खिंडार | पुढारी

भिंगारमध्येही शिवसेनेला पडले खिंडार

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर शहर शिवसेनेत उभी फूट पडलेली असतानाच, आता भिंगारमध्येही शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेचे भिंगार शहरप्रमुख प्रकाश फुलारी यांच्यासह छावणी मंडळाचे माजी नगरसेवक सुनील लालबोंद्रे, संजय छजलानी आणि रवींद्र लालबोंद्रे यांच्यासह एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाला आहे.

शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते व ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे भिंगार शहरप्रमुख प्रकाश फुलारी यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी गुरुवारी (दि.28) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेत, त्यांच्या गटात प्रवेश केला. यावेळी माजी नगरसेवक सचिन जाधव, काका शेळके आदी उपस्थित होते. भिंगार छावणी मंडळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, असे मिळून सात नगरसेवक होते. त्यापैकी शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने भिंगार शहरात शिवसेनाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

आजी-माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे नगर शहरातील शिंदे गटाला बळ मिळाले आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक आजी-माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, परिषद पंचायत समिती सदस्य, सरपंच व सदस्य आपल्या संपर्कात असल्याचा दावा नगर शहरातील शिंदे गटाकडून केला जात आहे.

Back to top button