स्मशानभूमीअभावी हेळसांड, भर पावसात वर ताडपत्री धरून अंत्यसंस्कार | पुढारी

स्मशानभूमीअभावी हेळसांड, भर पावसात वर ताडपत्री धरून अंत्यसंस्कार

काष्टी : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण गावाला स्मशानभूमी नसल्याने गुरूवारी (दि.28) पावसामुळे मृत व्यक्तीच्या चितेला वरच्या बाजूला ताडपत्री धरून दोनदा अग्निडाग देण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. तालुक्याचे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना याबाबत जाग येईल का, असा सवाल येथील आदिवासी समाजाने केला आहे. तालुक्यातील चोराचीवाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या भिंगाण येथील आदिवासी एकलव्य भिल्ल समाजातील अंकुश गुलाब गायकवाड या व्यक्तीचा मृत्यू झाला.

मुसळधार पाऊस आणि अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीत वर शेड नसल्याने, अंत्यविधी का करायचा असा प्रश्न होता. मात्र, मृतदेह जास्त वेळ ठेवता येणार नसल्याने सर्वांनी मिळून भर पावसात वर ताडपत्री धरून त्यांचे छत करीत दोनवेळा अग्नि देऊन अंत्यविधी केला. मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी अशी हेळसांड झाली. गावातील नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना, दुसरीकडे येथील आदिवासींना शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत.

या गावात 65 टक्के आदिवासी समाज आहे. तालुक्याला पूर्वी आदिवासी विकास खात्याचे मंत्रीपद मिळूनही कुठलेच काम झालेले नाही. आरोग्य, वीज, अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी यांची मोठी समस्या आहे. निवडणुका आल्या की नेतेमंडळी हात जोडतात, भरभरून आश्वासने देतात. निवडून येऊन पदे भोगतात. नंतर पुन्हा निवडणूक येईपर्यंत कोणी फिरकत नाही. शासनाने याची दाखल घेऊन भिंगाण येथील आदिवासी समाजाला न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

Back to top button