नगर : आरक्षणासाठी 16 गावांमध्ये विशेष ग्रामसभा | पुढारी

नगर : आरक्षणासाठी 16 गावांमध्ये विशेष ग्रामसभा

पारनेर, पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील डिसेंबर अखेर मुदत संपणार्‍या 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला. या आरक्षण सोडतीसाठी शुक्रवारी (दि.29) या गावांमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षण निश्चित केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार डिसेंबर अखेर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतची मुदत संपत आहे. यानुसार ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 21 जून रोजी आरक्षणासहित अंतिम प्रभार रचना प्रसिद्ध करण्यात आल्या; मात्र सर्वोच्च न्यायालयाने 20 जुलैला दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्याच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अशा ग्रामपंचायती वगळून उर्वरित ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या विचारात घेऊन त्यानुसार अन्य मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात आला. यासाठी शुक्रवारी विशेष ग्रामसभेचे आयोजनाचे आदेश तहसीलदार आवळकंठे यांनी दिले.

विशेष ग्रामसभेसाठी नियुक्त अधिकार्‍यांची नावे भाळवणी- तुकाराम ठाणगे, पळशी -दौलत येवले, पाडळी/कान्हूर- डी.डी.कदम, कोहकडी- डी. पी. शेकटकर, गोरेगाव -संजय आंबेकर, चौंभुत-एन. के. बोके, मस्केवाडी- पी. एस.उचाळे, सिद्धेश्वरवाडी- विजया नवले, हत्तलखिंडी- गजानन घुले, करंदी – एम.बी. मंडलिक, पिंपळगाव तुर्क – महेश बनकर, वनकुटे -बाळासाहेब कर्डिले, भोंद्रे- पी.बी.जगदाळे, पुणेवाडी – एस. ए.पोटे, गुणोरे – सोपान शिंदे, ढवळपुरी – मुरलीधर कोरडे आदी अधिकारी विशेष ग्रामसभेसाठी नियुक्त केले आहेत.

तालुक्यातील 16 ग्रामपंचायतमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षित जागा निश्चितीसाठी सोडतीचा कार्यक्रम विशेष ग्रामसभेत आयोजित केला. या ग्रामसभेसाठी संबंधित गावातील नागरिकांनी उपस्थित राहावे.

                                                        – शिवकुमार आवळकंठे, तहसीलदार, पारनेर.

Back to top button