नगर : अ‍ॅल्युमिनियमची तार चोरणारे दोघे गजाआड | पुढारी

नगर : अ‍ॅल्युमिनियमची तार चोरणारे दोघे गजाआड

नगर, पुढारी वृत्तसेवा : इलेक्ट्रिक टॉवरची अ‍ॅल्युमिनियम तार चोरी करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून 1 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

श्रीकांत ऊर्फ शिरक्या फकिरा मनतोडे (वय 20, रा. आश्वी खु, ता. संगमनेर), फारुख युसूफ सय्यद (वय 28, रा. जुने जोर्वे रोड, ता. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दि.19 जुलै 2022 रोजी पारनेर तालुक्यातील वासुंदे परिसरातील चार टॉवरची दोन लाख रुपये किंमतीची अ‍ॅल्युमिनियम तार चोरून नेल्याची फिर्याद विभाष कुमार भोलाप्रसाद महतो (रा.ओमसाई कॉम्प्लेक्स, लक्ष्मी चौक, नारायणगाव, ता. जुन्नर, जिल्हा पुणे) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिली होती.

दरम्यान, हा गुन्हा आरोपी श्रीकांत मन्तोडे याने केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने आश्वी येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. श्रीकांत मनतोडे याला अटक केल्यानंतर त्याने शरद ऊर्फ गोट्या हरिभाऊ पर्वत (रा. दाढ, ता. राहाता) व नरेंद्र ऊर्फ नर्‍या पंढरीनाथ इंगळे (रा. आश्वी, ता. संगमनेर) या दोघांच्या सहाय्याने गुन्हा केल्याची कबुली पोलिसांच्या तपासादरम्यान दिली आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी पारनेर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

भंगारात विकली होती तार

गुन्ह्यात चोरी केलेली टॉवरची इलेक्ट्रीक तार अकोले नाका (संगमनेर) येथील भंगार दुकानदार फारुख सय्यद याच्याकडे विक्री केल्याची माहिती आरोपीने दिली होती. पथकाने आरोपी भंगाराच्या दुकानामध्ये जाऊन फारुख युसूफ सय्यद याला ताब्यात घेतले. तसेच 490 किलो तार आरोपीकडून भंगारामध्ये घेतल्याची कबुली त्याने दिली.

उसाच्या शेतातून आरोपींचा पाठलाग

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींना अटक करण्यासाठी आश्वी येथे गेले असता पथकाची चाहुल लागताच आरोपींनी ऊसाच्या शेतातून पळ काढला. पाठलाग करुन पथकाने एकास ताब्यात घेतले. मात्र, दोन आरोपी पळून गेल्याने पोलिसांच्या हातातून निसटले.

Back to top button