कर्जत : संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या रथयात्रेसाठी दोन लाखांवर भाविकांची मांदियाळी | पुढारी

कर्जत : संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या रथयात्रेसाठी दोन लाखांवर भाविकांची मांदियाळी

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : धाकटी पंढरी अशी ओळख असलेले कर्जत येथील ग्रामदैवत थोर संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या रथयात्रेसाठी रविवारी (दि.24) भाविकांचा जनसागर उसळला होता. दोन लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. मोठ्या उत्साहात रथयात्रेला सुरुवात झाली. कोरोनामुळे सलग दोन वर्ष कर्जत येथील रथयात्रा रद्द करण्यात आली होती.

मात्र, यावर्षी निर्बंध हटविल्याने यात्रा भरविण्याचा निर्णय झाला आणि राज्यभरातून भाविक रथयात्रेसाठी आले होते. सकाळपासून पाऊस सुरू असतानाही मंदिराच्या बाहेर रांगा लावून भाविकांनी रात्री बारा वाजल्यापासून दर्शन घेतले. अभिषेक करण्यासाठी देखील मोठी गर्दी झाली होती. दुपारी एक वाजता पांडुरंगाचे आगमन झाल्यानंतर रथ जाग्यावरून हलविण्यात आला. रथयात्रा हलविण्याची वेळ आणि पावसाचे आगमन होण्याची अनेक वर्षांची परंपरा यावर्षीही कायम राहिली.

मंदिरामध्ये रात्री बरोबर बारा वाजता अभिषेक सुरू झाला. याचवेळी दर्शनासाठी देखील मोठी गर्दी झाली होती. भाविकांसह मानकर यांचेदेखील अभिषेक यावेळी झाले. मंदिरामध्ये सकाळी संगीत भजनचे आयोजन करण्यात आले होते. याचप्रमाणे ठिकठिकाणी फराळ, फळे, पाणी, चहा यांचे मोफत वाटप करण्यात येत होते.

पोलिस विभागाचा मनाचा ध्वज
ग्रामदैवत गोदड महाराज यात्रेनिमित्त पोलिस विभागाच्या मानाच्या ध्वजाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या उपस्थितीत सर्व पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांनी पोलिस ठाणे ते गोदड महाराज मंदिर अशी मानाच्या ध्वजाची मिरवणूक काढली. कर्जत बसस्थानक येथेे आ. रोहित पवार यांनी या मानाच्या ध्वजाचे हार घालून स्वागत केले. यानंतर मानाचा ध्वज मंदिरात नेण्यात आला. त्या ठिकाणी दर्शन घेऊन पुन्हा ध्वज पोलिस ठाण्यात परत आला.

रथ ओढण्यासाठी मोठी गर्दी
भव्य अशा लाकडी रथामध्ये पांडुरंगाची मूर्ती ठेवून हा रथ ओढण्याची गोदड महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरू आहे. मोठ्या संख्येने भाविक रथ ओढण्यासाठी गर्दी करतात. त्यात तरूणांची संख्या मोठी असते. यावेळी रथ ओढण्यासाठी संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. जागोजागी रथ उभा करण्याचे कौशल्य त्याला ओटी लावणारे करत असतात. दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती.

संपूर्ण कर्जत शहर भक्तीमय वातावरणात गोदड महाराज आणि पांडुरंगाच्या जयघोषात न्हावून निघाले होते. ग्रामीण भागातील वारकरी आपल्या गावापासून पायी दिंड्या घेऊन आले होते. पांडुरंगाचा जयजयकार करीत वारकर्‍यांनी रथाच्या पुढे भजन, भारुडे, अभंग म्हटले. ठिकठिकाणी फुगड्या खेळून ते हरिनामात दंग होऊन गेले होते. दरम्यान, गेेल्या अनेक दिवसांपासून कर्जत शहरामध्ये वृक्षारोपण व पर्यावरणाचे काम करणारे स्वच्छता दूत अशी ओळख असणारे सामाजिक संघटनेचे शिलेदार यांनी रविवारी कर्जत बसस्थानकापासून गोदड महाराज मंदिरापर्यंत पर्यावरण दिंडी काढली.

आ.पवार, खा.विखेंनी ओढला रथ
कर्जत येथील रथयात्रेनिमित्त आमदार रोहित पवार यांनी गोदड महाराज यांच्या समाधीला रविवारी सकाळी आठ वाजता अभिषेक करून दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी रथ ओढला. खा.डॉ.सुजय विखे हेही रथयात्रेसाठी आले होते. त्यांनीही यावेळी गोदड महाराजांचे दर्शन घेऊन रथ ओढला. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांमध्येही ते सहभागी झाले होते.

Back to top button