नगर : श्रीरामपुरात युवतीचे धर्मांतर करून अत्याचार | पुढारी

नगर : श्रीरामपुरात युवतीचे धर्मांतर करून अत्याचार

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वॉर्ड नं. 2 येथील इम्रान कुरेशी ऊर्फ मुल्ला कटर याने 16 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेतून पळवून नेवून जबरदस्तीचे धर्मांतर करून वेळोवेळी अत्याचार केला. बळजबरीने लग्न केल्याचा प्रकार उघड झाल्याने या परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, एस.पी. मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणातील आरोपी इम्रान कुरेशी ऊर्फ मुल्ला कटर याला पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीरामपूर शहर परिसरात राहणार्‍या एका कुटुंबातील 16 वर्षे वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला इम्रान कुरेशी ऊर्फ मुल्ला कटर याने ती मागास समाजाची आहे, हे माहित असतानाही तिला शाळेतून अपहरण करून जबरदस्तीने धर्मपरीवर्तन करून तिच्यासोबत लग्न केले.
इम्रान कुरेशी याने पिडीत अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ती गर्भवती झाली. तरीही आरोपी धमकी देवून तिच्यावर अत्याचार करीत आहे. या पिडीत मागास, गरीब विद्यार्थिनींच्या एका नातेवाईक महिलेने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून इम्रान कुरेशी ऊर्फ मुल्ला कटर याच्याविरूद्ध अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इम्रान कुरेश ऊर्फ मुल्ला कटर याची परिसरात मोठी दादागिरी होती, असे या परिसरातील नागरीक सांगत आहेत.
दरम्यान, घटनास्थळी डीवायएसपी संदीप मिटके, पो.नि. संजय सानप यांनी भेट दिली. याप्रकरणी डीवायएसपी मिटके पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणातील घटना पाहता ती अल्पवयीन विद्यार्थिनी असताना तिला कोणत्या शाळेतून पळवून नेले, कोठे बळजबरीने धर्मांतर केले, तिच्याशी कोठे लग्न लावले? कोणी लग्न लावले? तिच्यावर कोणत्या ठिकाणी अत्याचार झाला? हे सर्व प्रकार तपासातून पुढे येतील, मात्र या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेवून धर्मांतर करून अत्याचार केल्याच्या प्रकाराने परिसरात घबराट पसरली आहे.

Back to top button