नगर : निळवंडे कालव्याच्या बोगद्याचे काम पूर्ण | पुढारी

नगर : निळवंडे कालव्याच्या बोगद्याचे काम पूर्ण

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : जिरायत गावांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून बहुचर्चित असलेल्या निळवंडे धरणाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचे दिसत आहे. माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी अडिच वर्षामध्ये भरिव निधी मिळवित निळवंडेच्या कामांना येणार्‍या अडचणींसाठी वेळोवेळी पाठपुरावा घेतल्याने अखेर बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचे पाहून लाभार्थी ग्रामस्थांनी आ. तनपुरे यांचे आभार व्यक्त करीत आनंद साजरा केला.

अनंत अडचणींशी सामना करीत निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम अंतिम टप्प्यात आणण्यासाठी माजी राज्यमंत्री, आ. प्राजक्त तनपुरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत निळवंडे कालव्यासाठी भरीव निधी उपलब्ध केला. दरम्यान, निधी उपलब्ध झाल्यानंतर कालव्यांच्या कामांना गती आलेली असताना वन विभागाच्या जागेत काम होत असल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

यावर जलसंपदा, वन व महसूल विभागाची एकत्र बैठक घेत आ. तनपुरे यांनी समस्यांचा निपटारा केला. 9 मे 2022 रोजी निंभेरे, कानडगाव भेटी दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांसह निळवंडे कालव्याची पाहणी आ. तनपुरे यांनी केली होती. त्याचवेळी या कामाला गती देण्यास सांगत अधिकार्‍यांसह ठेकेदाराची कानउघाडणी करीत आ. तनपुरे यांनी महिन्याच्या आत बोगद्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कानडगाव, निंभेरे, तुळापूर आदी परिसरातील ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करीत निळवंडे कालव्यासाठी विशेष सहकार्य केलेले माजी खा. प्रसाद तनपुरे व माजी राज्यमंत्री आ. तनपुरे यांचे आभार व्यक्त केले. ऑक्टोंबर 2022 पर्यंत निळवंडे कालव्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी माजी खा. तनपुरे यांनी महाविकास आघाडी शासनाकडे केली होती. त्याची पूर्तता होणार असल्याचे समाधान ग्रामस्थ व शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिसत आहे.

निळवंडे बोगद्याचे काम पूर्ण होताच निंभेरे सरपंच राजेंद्र सिनारे, मंजाबापू चोपडे, ज्ञानदेव सिनारे, पोलिस पाटील गोरक्षनाथ सांगळे, शरद सिनारे, विजय सिनारे, भारत सिनारे, मच्छिंद्र कानडे, महेश साबळे, रामदास सिनारे, जिजाबापू सिनारे, आनंदा सिनारे, कानडगाव येथील डॉ. रविंद्र गागरे, लक्ष्मण गागरे, पोपट गागरे, जालिंदर गागरे, तुळापूर येथील चांगदेव हारदे, भिमराज हारदे, बापु हारदे यांसह शेतकरी व ग्रामस्थांनी बोगद्याचे काम होताच आनंद साजरा केला आहे.

Back to top button