खेड परिसरात बिबट्याची दहशत | पुढारी

खेड परिसरात बिबट्याची दहशत

खेड : पुढारी वृत्तसेवा :   वेळ पहाटे तीनची…खेडच्या शिवारातील ऊस शेतीचा अंबेराई परिसर…ठरल्याप्रमाणे बिबट्याचा जीवघेणा हल्ला… बिबट्याने शेतकर्‍याच्या दोन शेळ्या जखमी करून कुत्र्याचाही फडशा पाडल्याची घटना दि.15 रोजी पहाटे तीन वाजता घडली. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत.

गेल्या तीन-चार महिन्यांपासून याच परिसरात असलेल्या बिबट्याच्या वास्तव्याने येथील नागरिक अक्षरशः भयभित झाले आहेत. बिबट्याने शेतकर्‍यांच्या जनावरांवर हल्ला केलेली ही पहिली-दुसरी नव्हे, तर चौथी घटना आहे. दि. 15 रोजी पहाटे 3 च्या सुमारास लालासाहेब मोरे या शेतकर्‍याच्या दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला.

बिबट्याचा हल्ला पाहून त्यांनी पाळलेल्या कुत्र्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिबट्याने कुत्र्याची केलेली अवस्था नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत समोर आली आहे. खेड परिसरात गेली वर्षभरापासून बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, जीवितहानी न झाल्यामुळे याकडे ना नागरिक, ना वनविभागाने गांभीर्याने पाहिले.

भीमा नदीच्या फुगवट्यामुळे या भागाला असलेले मुबलक पाणी, उसाचे अतिरिक्त क्षेत्र यामुळे या भागात बिबट्याच्या वास्तव्याला पोषक वातावरण तयार झाले आहे. मध्यंतरीच्या काळात बिबट्याचे वारंवार नजरेस पडणे, तसेच त्याने केलेल्या हल्ल्याच्या अनेक घटना पाहता वनविभागाने याच परिसरात पिंजरा लावला होता. मात्र या पिंजर्‍याकडे बिबट्याने पाठ फिरवल्याने उपयोग झाला नाही.

एकाच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेले हल्ले यामुळे पिंजरे नेमके कोठे लावावेत? असा प्रश्न वनविभागाला पडला होता.बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला नसला, तरी कमी उंचीच्या जीवांवर बिबट्या सहजपणे हल्ला करतो त्यामुळे शाळेत जाणार्‍या लहान मुलांवर पालकांनी अधिक लक्ष ठेवण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
गेल्या अनेक महिन्यांपासून भांबोरा, खेड भागात बिबट्याचे वास्तव्य आहे. बिबट्याने नागरिकांवर आजपर्यंत हल्ला केला नाही. नागरिकांनी याबाबत जनजागृती करावी.अधिकची काळजी घ्यावी. आपली जनावरे बंदिस्त ठिकाणी बांधावीत. कमी उंचीच्या जीवांवर बिबट्या हल्ला करतो त्यामुळे शक्यतो लहान मुलांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन  कर्जतचे वन परिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी केले आहे.

Back to top button