नगर : राहुरीमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह | पुढारी

नगर : राहुरीमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : बायको व मुलांना सोडून गेलेल्या बापाने आपल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका 25 वर्षीय मुलाबरोबर विवाह लावून दिल्याची घटना काल (दि. 12) घडली. पीडित मुलीच्या आईला माहिती मिळताच तिने न्याय मिळविण्यासाठी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

या घटनेतील बापाला पहिली एक लग्नाची बायको व चार मुली, एक मुलगा आहे. सुमारे तीन वर्षांपासून तो बायको मुलांना सोडून शहरातील मुलनमाथा परिसरात एका महिलेसोबत राहत आहे. दोन महिन्यांपूर्वी तो पहिल्या बायकोकडून तीन नंबरच्या मुलीला घेऊन गेला. त्या बापाने मुलीच्या आईला काही एक न सांगता काल या अल्पवयीन मुलीचा विवाह टाकळीमियॉ येथील एका 25 वर्षीय मुलाबरोबर राहुरी फॅक्टरी परिसरातील एका ठिकाणी लावून दिला.

मुलीच्या आईची पोलिसांत धाव

या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या आईने राहुरी येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडे धाव घेतली. त्यानंतर ते सर्वजण राहुरी पोलिस ठाण्यात गेले. मला व माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या, अशी मागणी त्या पीडित मुलीच्या आईने पोलिस अधिकार्‍यांकडे केली.
या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित मुलीची आई पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसली होती. दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

काल विवाह झालेल्या पीडित मुलीच्या आई-वडिलांनी सुमारे एक ते दीड वर्षापूर्वी याच अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले होते. त्यानंतर पहिल्या पती पासून सोडचिठ्ठी घेतली. त्यानंतर काल त्याच मुलीचा दुसरा विवाह लावून दिला. या घटनेचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल होणार का? पीडित मुलीला न्याय मिळणार का? असा प्रश्न नागरिकांमधून होत आहे.

Back to top button