नगर : जायकवाडीत 4 दिवसांत 6 टीएमसी | पुढारी

नगर : जायकवाडीत 4 दिवसांत 6 टीएमसी

शेवगाव/भातकुडगाव : पुढारी वृत्तसेवा : नाशिक परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसाने जायकवाडीत पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. चार दिवसांपूर्वी 33 टक्के असलेला साठा 39 टक्क्यांवर पोहचला आहे. गोदावरीतून 45 हजार 938 क्युसेक पाण्याची आवक सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे .

यंदा जून महिन्यात जेमतेम पाऊस झाला. त्यामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊ शकली नाही. मात्र जुलै महिन्यात पावसाचा वाढता जोर आणि नाशिक भागातील अतिवृष्टी पाहता जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. जायकवाडीचा साठा मंगळवारी (दि.12) 39.70 टक्के पाणी नोंदला गेला. नांदूर मध्यमेश्वर बंधार्‍यातून गोदावरी पात्रात 79 हजार क्युसेक पाणी वाहत आहे. बुधवारी रात्री अथवा उद्यापर्यंत हे पाणी जायकवाडी गाठण्याची शक्यता आहे.

अधिकारी, कर्मचार्‍यांकडून देखरेख

अतिवृष्टीने वाढणारी पाणी आवक लक्षात घेऊन उत्तर पैठण जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अभियंता ज्ञानदेव शिरसाठ, शाखा अभियंता विजय काकडे हे अधिकारी पाण्यावर नियत्रंण ठेवून असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश खराडकर, आबासाहेब गरुड, अब्दुल बारी गाझी व इतर कर्मचारी पाणी देखरेखीस तैनात आहेत.

Back to top button