टाकळीभान : आषाढी एकादशीची जय्यत तयारी सुरू | पुढारी

टाकळीभान : आषाढी एकादशीची जय्यत तयारी सुरू

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा:  श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील पुरातन यादव कालीन व प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशी उत्सव सोहळा रविवार, दि. 10 जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी पहाटे 3.30 ते 4.30 अभिषेक व त्यानंतर श्री विठ्ठल रुख्मिणी यांच्या मूर्तींना गंगाजलाने स्नान, महापूजा होवून 5.30 वाजता उत्सव मूर्ती पूजा व आरती प्रांताधिकारी अनिल पवार यांचे हस्ते होणार आहे. दुपारी 12 वाजता आरती, 2 ते 5 भजन, 5 वाजता दिंडी निघणार असून दिंडीची ग्राम प्रदक्षिणा झाल्यावर सायंकाळी 6 वाजता आरती व रात्री कीर्तन होणार आहे.

आषाढ शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा या दरम्यान येथील आषाढी उत्सव साजरा केला जातो. या दरम्यान दररोज भाविकांकडून अन्नदान केले जाते. दररोज सायंकाळी 5 वाजता दिंडी काढली जाते. ग्रामप्रदक्षिणा करून दिंडी मंदिरात आल्यावर आरती होवून महाप्रसाद दिला जातो.चतुर्दशीच्या दिवशी भंडारा केला जातो.

या दिवशी टाकळीभान व परिसरातील व अन्य ठिकाणाहून भजनी मंडळ टाळ, मृदंग, विणा यासह दिंड्या घेवून येतात व श्री विठ्ठलाच्या दरबारी हजेरी लावतात. रात्रभर जागर करून सकाळी प्रसाद घेवून जातात. पौर्णिमेच्या दिवशी दहिहंडीच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होते. विठ्ठल-रुख्मिणीचे मंदिर पार पुरातन यादवकालीन आहे. संपूर्ण मंदिर दगडी बांधकामाचे असून मंदिरामध्ये सुंदर नक्षीकाम केलेले आहे. येथील श्री विठ्ठलाची मूर्ती ही चतुर्भूज विष्णूस्वरूप आहे. दोन हात कमरेवर असून उर्वरित दोन हातांपैकी एका हातात शंख व एका हातात चक्र आहे. ओठावर मिशा आहेत. मस्तकी स्पष्ट दिसेल, असे शिवलिंग आहे. छातीवर कौस्तुभमणी आहे.

Back to top button