नगर : संसार उघड्यावर; पूल, बांध, रस्ते गेले वाहून! | पुढारी

नगर : संसार उघड्यावर; पूल, बांध, रस्ते गेले वाहून!

जेऊर : शशिकांत पवार : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात शनिवारच्या (दि.11) जोरदार वादळीवार्‍यासह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जेऊर परिसरात सीना व खारोळी नदीला आलेल्या महापुरामुळे खूपच विदारक चित्र पहावयास मिळत आहे. गावातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांनी पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

शक्ती कपूरचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत, बंगळूर पाेलिसांची कारवाई

जेऊर गावातील मगर मळा, ससे मळा, अमरधामजवळील नवीन पूल, तसेच संतुकनाथ विद्यालयाचा पूल वाहून गेले आहेत. वाड्या – वस्त्यांवरील अनेक रस्ते वाहून गेल्याने नागरिकांचे अतोनात हाल सुरू आहेत. मगर, ससे व नाईक मळ्यातील नागरिकांचा गावाशी असणारा संपर्क तुटला आहे. नगर-औरंगाबाद महामार्गालगत लावण्यात आलेले सर्व फ्लेक्स बोर्ड, परिसरातील तसेच महामार्गावर मोठमोठाली झाडे उन्मळून पडली होती. विद्युत लाईनचे पोल तसेच विद्युत वाहिन्या ठिक ठिकाणी तुटल्याने जेऊर परिसर अंधारातच आहे.

नगर औरंगाबाद महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने महावितरण कंपनी चौक परिसरातील व्यावसायिक तसेच घरांमध्ये पावसाचे पाणी गेले होते. कोकणवाडी परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. जेऊरसह बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर येथील शेतकर्‍यांचे बांध वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.काही कांदा चाळीवरील पत्रे उडून गेल्याने कांदे भिजून नुकसान झाले, तर अनेक व्यावसायिकांचे पत्र्याचे शेड उडून गेले आहेत.

शिवसेना आमदार लताबाई सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैधच; मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली

जेऊर गावाला पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी सीना नदिच्या पुरामुळे वाहून गेल्याने गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. परिसरातील दीपक पवार, मनोज कोथिंबिरे, आबासाहेब सोनवणे, शंकर तोंडभर, पाटोळे यांच्यासह इतर काही जणांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. सुमारे दोन तास वादळीवार्‍यासह जोरदार पाऊस सुरू होता. महापुरामुळे गावामध्ये सर्वत्र गाळाचे साम्राज्य पसरले असून रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.

एकंदरीत जेऊर परिसरात पहिल्याच पावसाने सर्वांचीच दाणादाण उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचा फार्स प्रशासनाच्या वतीने करण्यात येतो परंतु प्रत्यक्षात मात्र मदत मिळत नाही. मागील वर्षी पूरपरिस्थितीत झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी गावात आले, पंचनामे केले पण अद्यापपर्यंत मदत मिळालेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. जेऊर परिसरात पेरणीयोग्य पाऊस झाला असून जमिनीत पुरेशी ओल गेलेली आहे. त्यामुळे वापसा झाला की लगेच मूग, सोयाबीन, बाजरी पेरणीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू होणार आहे. बियाणे खरेदीसाठी बाजारात शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे.

Amit Shah : त्र्यंबकेश्वरच्या समर्थ गुरुपीठात अमित शाह करणार योग दिवस साजरा

आदिवासी समाजाची धाकधूक वाढली

मागील वर्षी पिंपळगाव तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर तलावाच्या कडेला राहणार्‍या आदिवासी कुटुंबांच्या पालामध्ये पाणी शिरले होते. आदिवासी समाज व तेथील चिमुकल्यांचे अतोनात हाल होत होते. जीव मुठीत धरून हा समाज जीवन जगत होता. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह विविध अधिकार्‍यांनी भेट देऊन घरकुल देण्याचे आदेश दिले होते. परंतु प्रत्यक्षात काहीही कारवाई झालेली नाही. चालू वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने येथील आदिवासी समाजाची धाकधूक वाढली आहे.

गॅस पाईपलाईनच्या कामावर नागरिकांचा संताप

गॅस पाईपलाईनच्या कामामुळे जेऊर परिसरातील शेतकर्‍यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. गॅस पाईपलाईनच्या कामामुळे अनेक पूल बंद करण्यात आले आहेत. रस्त्यालगत माती टाकल्याने पाणी जाण्यास जागा नसल्याने शेतकर्‍यांचे बांध फुटले, तर कांदा चाळीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी पाईपलाईनच्या कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

मुसेवाला हत्त्या प्रकरण : पोलिसांनी सांगितला संतोष जाधवच्या अटकेचा थरार

व्यापारी संकुल उभारण्याची गरज

जेऊर गावची मुख्य बाजारपेठ सीना नदीपात्रात अतिक्रमणात वसलेली आहे. प्रत्येक पुराचा फटका येथील व्यावसायिकांना बसत आहे. येथील अतिक्रमण हटविण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांनी सुमारे चार वर्षांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयास दिलेले आहेत. परंतु प्रत्यक्षात काहीही कारवाई झालेली नाही. अतिक्रमण हटवून भव्य व्यापारी संकुल उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

जेऊर परिसरात झालेल्या घरांच्या पडझडीबाबत महसूल विभागाच्या वतीने पाहणी करण्यात येणार आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मंडळाधिकारी वृषाली करोसिया यांनी गावात जाऊन पाहणी केली आहे.

                                                                               – उमेश पाटील, तहसीलदार.

जोरदार पावसामुळे घरावरील सर्व पत्रे उडून गेले. संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्य भिजून मोठे नुकसान झाले आहे. भरपावसात महिला व मुले भिजत होती. आमचे कुटुंब उघड्यावर आले आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन मदत करावी.- आबासाहेब सोनवणे.
जेऊर परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील पाण्याची पाईपलाईन वाहून गेली आहे. अनेक पूल, रस्ते, बांध वाहुन गेले, तसेच व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्ते, पूल दुरुस्तीसाठी प्रशासनाने तत्काळ निधी मिळणे गरजेचे आहे.

                                                                           – राजश्री मगर, सरपंच, जेऊर.

Back to top button