वादळी वार्‍यामुळे पारनेरमध्ये शेतीचे नुकसान, अधिकार्‍यांचे दुर्लक्ष | पुढारी

वादळी वार्‍यामुळे पारनेरमध्ये शेतीचे नुकसान, अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

पारनेर : पुढारी वृत्तसेवा: मान्सूनपूर्व पावसाने पारनेर तालुक्यात हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, वादळामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेडनेट उखडून पडल्यामुळे दुष्काळातही मोठी कसरत केलेल्या शेतकर्‍यांचे पुरते कंबरडे मोडले आहे.

तालुक्यात दि. 8 रोजी पावसाने हजेरी लावली. अनेक भागात पाऊस झाला. यामध्ये सुपा, जामगाव, कान्हूर पठार, करंदी, गोरेगाव, वाडेगव्हण, जवळ्यासह अन्य भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. या पावसाबरोबरच आलेल्या वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले. दुष्काळातही उमेदीने घेतलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. वाडेगव्हाण येथील प्रगतशील शेतकरी दीपक खंदारे यांच्यासह काही शेतकर्‍यांच्या शेडनेटचे मोठे नुकसान झाले. खंदारे यांचे शेडनेटचे कापड फाटले असून, जवळपास दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पुणे: अध्यक्षांसह खेडच्या जि. प. सदस्यांच्या इच्छांना सुरुंग

खंदारे म्हणाले की, दहा ते बारा लाख रुपये खर्च करून शेडनेट उभारले आहे. अचानक आलेल्या वादळामुळे शेडनेटचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेडनेटमध्ये पीक नव्हते. त्यामुळे मोठे नुकसान टळले. तरीही दुरुस्तीसाठी मोठा खर्च येणार आहे. तालुक्यातील करंदी येथील शेतकरी रामभाऊ कारभारी ठाणगे यांच्या शेतातील शेडनेटचे मोठे नुकसान झाले. वार्‍यामुळे शेडनेटचे अँगल व पट्ट्या तुटल्या असून कापड फाटले आहे.

जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे रामभाऊ ठाणगे यांनी सांगितले. शेडनेटमध्ये असलेले काकडीचे पीक काढल्याने नुकसान टळले. शेडनेटमध्ये घेण्यात येणारे पीक खरीप किंवा रब्बी हंगामामध्ये धरले जात नाही. त्यामुळे या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यात अडचण असून, त्याचा पीकविमाही मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे या शेतकर्‍यांचे पुरतेच कंबरडे मोडून गेले आहे.

अधिकारी फिरकलेही नाही
मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असला, तरी वादळी वार्‍यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. शेडनेट साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामा करणे दूरच, पण कोणत्याही अधिकार्‍याने घटनास्थळी जाऊन पाहणी केली नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Back to top button