संगमनेरात नॅशनल ग्राऊंडचे अतिक्रमण भुईसपाट | पुढारी

संगमनेरात नॅशनल ग्राऊंडचे अतिक्रमण भुईसपाट

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा
संगमनेर शहरातील जोर्वे नाका येथील नगरपालिकेच्या स्वमालकीच्या जागेवर सुमारे 98 कोटी रुपये खर्च करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पावर असणारे कच्ची-पक्की अतिक्रमणे काढण्यास पालिका प्रशासनाने सहा जेसीबी घेऊन गेले असता या प्रकल्पास काहींनी विरोध केला.
मात्र, पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची तंबी देताच विरोध करणार्‍यांना हुसकावून लावले. संगमनेर शहरातून वाहून येणारे सांडपाणी थेट प्रवरा नदीला जाऊन नदी प्रदूषित होत होती. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी शहरातील जोर्वे नाका परिसरातील यंग नॅशनल ग्राऊंडच्या पाठीमागील बाजूस पालिकेच्या मालकीची दोन एकर जागा आहे.
याच जागेवर पालिका सांडपाणी प्रक्रिया व जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटू शकेल, अशा प्रकारचा भ्रम काहींनी निर्माण केल्याने या प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी एकत्रित येत त्याला विरोध केला होता. त्यामुळे पालिकेला विना कारवाई हात हलवित माघारी फिरावे लागले होते. त्यामुळे हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला की काय असे परिसरात राहणार्‍या नागरिकांना वाटत होते.
संगमनेर नगरपलिकेच्या पथकाने पालिकेने काल सकाळी 10 वाजता सहा जेसीबी, चार ट्रॅक्टर व सुमारे सव्वाशे कर्मचार्‍यांसह पोलिस फौजफाटा सोबत घेत मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी पालिकेच्या स्वमालकीचा असणारा भूखंड साफ करून त्यावरील कच्ची-पक्की अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू केली. त्यावेळी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी हजर राहून या मोहिमेत अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली.
यंग नॅशनल ग्राऊंडला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता दिवसभर काढण्यात येऊनही सर्व जागा सपाट करण्यात आली.
दीड वर्षात सांडपाणी प्रकल्प पूर्ण करणार सांडपाणी प्रकल्प संगमनेर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध झालेल्या या पाण्याचा शेतीसाठी पुनर्वापर करण्याचा सुमारे 98 कोटी रुपये खर्च करून नगरपरिषद हा प्रकल्प अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत उभारणार आहे.
शहराच्या विविध भागात पसरलेल्या जवळपास दीडशे किलोमीटर अंतराच्या गटारांमधून शहरातील संपूर्ण सांडपाणी या प्रकल्पापर्यंत आणण्यात येणार आहे. त्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा शेतीसाठी व उद्यानांसाठी पुनर्वापर करणार असून शेतकर्‍यांना पाणी विकले जाणार असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी वाघ व बांधकाम अभियंता राजेंद्र सुतावणे यांनी दिली.
हे ही वाचा: 

Back to top button