Nashik | …अखेर ‘त्या’ चिमुकलीवर उपचार सुरू | पुढारी

Nashik | ...अखेर 'त्या' चिमुकलीवर उपचार सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – खेळताना हाताला झालेल्या गंभीर दुखापतीवर तत्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे असतानाही कर्तव्यापासून दूर पळणाऱ्या बिटको रुग्णालयातील डॉक्टर्स ‘पुढारी’च्या दणक्यानंतर वठणीवर आले. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, ‘त्या’ चिमुकलीवर उपचार सुरू केलेच, शिवाय डॉक्टरांचे एक पथकच तिच्या दिमतीला असल्याचे दिसून आले. मात्र, जोपर्यंत आवाज उठविला जात नाही, तोपर्यंत उपचाराला दाद दिली जात नसल्याने रुग्ण व नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

नाशिकरोड परिसरात राहणारी आठ वर्षाची चिमुकली खेळत असताना, तिच्या हाताला दुखापत झाली. हातावर पोट असलेल्या तिच्या पालकांनी तिला तत्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले. मात्र, बिटको रुग्णालयातील शस्त्रक्रिया तज्ज्ञांची नुकतीच बदली झाल्याने, तिच्यावर अन्य रुग्णालयात शस्त्रक्रिया करावी असा पालकांना सल्ला दिला. परंतु, दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत असलेल्या पालकांनी अन्य ठिकाणी उपचारास असमर्थता दर्शविली. तसेच दररोज ते आपल्या चिमुकलीला बिटको रुग्णालयात घेऊन येत होते. रुग्णालयाच्या डॉ. जितेंद्र धनेश्वर यांचीही त्यांनी भेट घेतली. मात्र, त्यांनी सर्जनच्या बदलीचा रेटा पुढे केला. संतापजनक म्हणजे ज्यांची बदली झाली, त्या डॉ. शिल्पा काळे यांचीही पालकांनी भेट घेतली. मात्र, त्यांनीही माझी मनपा मुख्यालयात बदली झाल्याचे पालकांना सांगितले. गेल्या चार दिवसांपासून हा खेळ सुरू असल्याने, ती चिमुकली असह्य वेदनांनी विव्हळत होते.

तिच्या वेदना बघून परिसरातील काही सूजान नागरिकांनी पुढाकार घेतला. त्यांनी डॉक्टरांकडे विनंती केली. मात्र, त्यांनाही उडवाउडवीचे उत्तरे दिली गेली. जेव्हा या संपूर्ण प्रकाराला ‘पुढारी’ने वाचा फोडली तेव्हा मात्र, रुग्णालय प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले. पुढारीमध्ये याबाबतचे बुधवारी (दि.२२) वृत्त प्रसिद्ध होताच, डॉक्टरांनी त्या चिमुकलीला तत्काळ अॅडमिट करून घेत तिच्यावर उपचार सुरू केले.

व्हीआयपी ट्रिटमेंट

गेल्या चार दिवसांपासून त्या चिमुलीच्या वेदनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बिटको रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्ठूरपणा ‘पुढारी’ने समोर आणल्यानंतर, त्या चिमुकलीवर उपचारासाठी डाॅक्टरांचे एक पथकच कामाला लागले आहे. तिला अत्यंत व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे. बुधवारी (दि.२२) दिवसभर तिच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे रिपोर्ट गुरुवारी समोर आल्यानंतर तिच्यावरील शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जाणार आहे.

बिटको रुग्णालयात असे प्रकार नित्याचेच आहेत. वरिष्ठ डॉक्टर्स कर्तव्यात कसूर करीत असल्याने, त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी निवेदनाद्वारे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांच्याकडे केल्या आहेत. मात्र, तरीही सुधारणा होताना दिसत नसल्याने, आचारसंहिता संपताच डॉ. चव्हाण यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी करणार आहोत. – जगदीश पवार, माजी नगरसेवक.

हेही वाचा:

Back to top button