संतापजनक! सर्जनच्या तडकाफडकी बदलीचा खेळ; चिमकुलीवर शस्त्रक्रियेसाठी नाही त्यांना वेळ

संतापजनक! सर्जनच्या तडकाफडकी बदलीचा खेळ; चिमकुलीवर शस्त्रक्रियेसाठी नाही त्यांना वेळ
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – उपचारापेक्षा असुविधांनीच अधिक कुपरिचित असलेल्या नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या (सर्जन) बदलीचा खेळ मांडल्याने, एका चिमुकलीवर तातडीची शस्त्रक्रिया न होऊ शकल्याने ती असह्य वेदनांनी विव्हळत आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या या चिमुकलीच्या पाल्यांना रुग्णालयातीलच डॉक्टरांकडून खासगीसह अन्य रुग्णालयात उपचाराचा सल्ला दिला जात असल्याने, या चिमुकलीचे पालक हतबल झाले आहेत.

नाशिकरोडसह पंचक्रोशीतील रुग्णांसाठी उभारलेल्या बिटको या रुग्णालयात डॉ. शिल्पा काळे या एकमेव सर्जन होत्या. मात्र, महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी ऐन आचारसंहिता काळात त्यांची महापालिका मुख्यालयात बदली केली. या तडकाफडकी बदलीमागचे कारण गुलदस्त्यात असले तरी, शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांना मोठ्या हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. चार दिवसांपासून एक आठ वर्षाची चिमुकली शस्त्रक्रियेसाठी दररोज पालकांसह येत आहे. खेळताना तिच्या हाताला दुखापत झाल्यानंतर त्यावर मोठी सूज आली आहे. त्यामुळे तिला असह्य वेदना होत असून, तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया गरजेची आहे. मात्र, अचानक सर्जनची बदली केली गेल्याने, या चिमुकलीवर उपचार कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संतापजनक म्हणजे या चिमुकलीची दुखापत गंभीर असतानाही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून तिची दररोज तपासणी केली जात आहे. परिणामी, गेल्या चार दिवसांपासून ही चिमुकली विव्हळत असतानाही तिला बघण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या गलथान कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या चार दिवसांपासून ही चिमुकली रुग्णालयात येत आहे. मात्र, सर्जन नसल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया केली जात नाही. याबाबत डॉ. धनेश्वर यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनीदेखील सर्जन नसल्याचे कारण देऊन उपचारास नकार दिला. मुळात आचारसंहितेत बदली करण्यामागचे कारण काय? मुख्यालयात आधीच एक सर्जन असताना, त्यासोबत दुसऱ्या सर्जनची गरज काय?, मनपा वैद्यकीय विभागाचा हा मनमानी कारभार आहे. – जगदीश पवार, माजी नगरसेवक.

आचारसंहिता काळात बदली

बिटको रुग्णालयाच्या सर्जन डॉ. शिल्पा काळे यांची ऐन आचारसंहितेत मनपा मुख्यालयात बदली केली. बदली करताना त्यांच्या जागी नव्या सर्जनची नियुक्ती केली गेलेली नाही. विशेष म्हणजे डॉ. काळे या दररोज बिटको रुग्णालयात जातात. मात्र, त्यांच्याकडे एखादा रुग्ण गेल्यास, 'माझी बदली झाली आहे' असे त्या रुग्णांना सांगत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाइकांनी केल्या आहेत. वास्तविक मनपा मुख्यालयात बदली केली गेली असली तरी, 'रुग्णालयातील कामे सांभाळून मुख्यालयात वेळ द्यावा' अशा सूचना संबंधितांना दिल्या जातात. मात्र, अशातही बदलीच्या नावे सर्जन पदावरील व्यक्तींकडून रुग्ण हाताळण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे.

या चिमुकलीच्या पालकांची आर्थिक स्थिती खूपच दयनीय आहे. ती मुलगी नाशिक रोड येथील गुरुद्वाराजवळ रडत असताना आम्ही तिला बिटको रुग्णालयात घेऊन आलो. मात्र, याठिकाणी सर्जन नसल्याचे सांगितले गेले. त्या मुलीवर तत्काळ शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. मात्र, डॉक्टरच नसल्याने त्या चिमुकलीला वेदना सोसाव्या लागत आहेत. – रामजितसिंह कोहली, व्यावसायिक.

त्या मुलीवर तत्काळ शस्त्रक्रिया केली जाईल. वास्तविक, डॉ. धनेश्वर आणि डॉ. शिल्पा काळे यांनीच त्या मुलीवर उपचार करणे अपेक्षित आहे. बदली केली म्हणजे याचा अर्थ तुम्ही सेवा न देणे असा होत नाही. ठरलेल्या ठिकाणी सेवा देऊन तुम्ही मुख्यालयात वेळ देणे, असा बदलीचा अर्थ होतो. या प्रकरणी तत्काळ लक्ष घातले जाईल. – डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, मनपा.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news