Lok Sabha election 2024 : आज माघारीचा दिवस, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष | पुढारी

Lok Sabha election 2024 : आज माघारीचा दिवस, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक लढविणार की, माघार घेणार याकडे लक्ष लागून आहे. त्यांच्या या भूमिकेनंतरच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

चव्हाण यांनी भाजपकडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, भाजपने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनाच पुन्हा एकदा तिकीट जाहीर केल्याने चव्हाण नाराज आहेत. त्यांनी मतदारसंघातील आपल्या मित्र परिवार व भाजपतील त्यांच्या समर्थकांशी चर्चा करून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. चव्हाण यांनी उमेदवारी करू नये, यासाठी भाजपकडून बरेच प्रयत्न केले. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. आता भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी चव्हाणांचे बंड थंड करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून, चव्हाणांची मनधरणी करण्यात नेत्यांना कितपत यश येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आज चित्र स्पष्ट होणार
आज सोमवारी (दि. ६) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्यामुळे माजी खा. चव्हाण काय भूमिका घेतात याकडे मतदारसंघातील नेत्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Back to top button